प्रशांत शिंदे, सुमित गुजर, महेश कुंभार ठोकणार शड्डू
वार्ताहर / औंध
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी सातारा येथे झालेल्या जिल्हास्तरीय निवड चाचणीत खटाव तालुक्यातील तीन मल्लांची गादी आणि माती गटातून निवड झाली आहे.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी जिल्हा तालिम संघाच्या वतीने निवड चाचणी घेण्यात आली. यामध्ये 97 किलो माती गटात जाखणगांव (ता. खटाव) येथील प्रशांत शिंदे याने आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करून संघातील आपले स्थान निश्चित केले. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत यापूर्वी त्याने 97 किलो गटात कास्यपदक जिंकले होते. यंदा पदकाचा रंग बदलण्याचे आव्हान शिंदे याच्यापुढे आहे. तो सांगली येथे भोसले व्यायामशाळेत सराव करीत आहे. खातगुण येथील शालेय कुस्ती स्पर्धेतील पदक विजेता सुमित गुजर याची 61 किलो माती गटातून जिह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. तसेच बुध (ता. खटाव) चा लढवय्या मल्ल महेश कुंभार 74 किलो गादीगटातून आखाडय़ात उतरणार आहे.
गुजर आणि कुंभार सह्याद्री संकुल पुणे येथे सराव करीत आहेत. विजयी मल्लांना वस्ताद शहाजीनाना पवार, संभाजी सावर्डेकर, विजय बराटे, विकास गुरव यांचे मार्गदर्शन लाभले. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेल्या मल्लांचे सर्वत्र कौतुक होत आहे.