ऑनलाईन टीम / जळगाव :
शिरपूर येथिल ट्रेनर एअर क्रॉफ्ट अर्थात वैमानिकांना प्रशिक्षण देणारे एक विमान जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात असलेल्या वर्डी शिवारातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या घनदाट जंगलात कोसळले. या दुर्घटनेत प्रशिक्षक वैमानिकाचा मृत्यू झाला तर प्रशिक्षणार्थी तरुणी गंभीर जखमी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज दुपारी चार वाजता घडली. कॅप्टन नूरल अमीन (वय 30) असे मृत वैमानिकाचे नाव आहे. तर अपघातात प्रशिक्षणार्थी अंशिका गुजर (वय 24) जखमी झाली आहे. वर्डी गावापासून सुमारे तीन ते साडेतीन किलोमीटर अंतरावर सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या रामतलाव परिसरातील घनदाट जंगलात हे विमान कोसळले आहे.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील ‘एसव्हीकेएम’ मंडळाच्या निम्स अकॅडमी ऑफ एव्हिएशनचे हे शिकाऊ वैमानिकांना प्रशिक्षण देणारे विमान होते. आज शुक्रवारी सकाळी अकॅडमीकडून नेहमीप्रमाणे शिकाऊ वैमानिकांना विमान उडवण्याचे प्रशिक्षण दिले जात होते.
दुपारी अकॅडमीचे प्रशिक्षक कॅप्टन नूरल अमीन आणि प्रशिक्षणार्थी महिला वैमानिक अंशिका गुजर या दोघांनी विमानाने उड्डाण घेतले होते. त्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास विमान हवेतून जमिनीवर कोसळले. दिशा भरकटून विमानाच्या इंजिनात तांत्रिक बिघाड झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेत कॅप्टन नूरल अमीन हे ठार झाले तर प्रशिक्षणार्थी महिला वैमानिक अंशिका गुजर ही गंभीर जखमी झाली.
दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी त्यावर शोक व्यक्त केला आहे. एनएमआयएमएस अकॅडेमी ऑफ एविएशन यांच्या मालकीच्या प्रशिक्षण हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचे वृत्त धक्कादायक आहे.
यासंदर्भात तपास करण्यासाठी पथक तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. दुर्दैवाने या हेलिकॉप्टरमधील प्रशिक्षकाचा मृत्यू झाला असून ट्रेनी पायलट गंभीर जखमी झाली आहे, असे ट्वीट ज्योतिरादित्य सिंदिया यांनी केले आहे.