ऑनलाईऩ टीम / अमरावती
मुंबईतील साकीनाका परिसरात काल शुक्रवार दि. 10 सप्टेंबर रोजी एका युवतीवर बलात्कारानंतर तीच्यावर अमानुष अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती. यात पीडितेची स्थिती गंभीर होती. 48 तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर तीचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला आहे. यामुळे समाजातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ह्या घटनेचे पडसाद उमटत असतानाच अमरावती जिल्ह्यात अल्पवयीन गर्भवती बलात्कार पीडितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर पीडिता सात महिन्यांची गर्भवती असल्याचं समोर आलं आहे.
अमरावती जिल्ह्यातील येवला पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. पीडिता गावात आपल्या आई – बाबांसोबत राहत होती. १७ वर्षीय पीडित मुलीसोबत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवण्यात आले. या प्रकारात मुलगी सात महिन्यांची गरोदर राहिली होती . ही बाब तिच्या पालकांना समजली नव्हती, मात्र आत्महत्या झाल्यावर रुग्णालयात शवविच्छेदन अहवालात मृत युवती सात महिन्यांची गर्भवती असल्याचं स्पष्ट झाले आहे. पीडितेच्या आई-वडिलांनी शुक्रवारी येवदा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. या दोन झालेल्या दुर्दैवी घटनामुळे नागरिकातून संताप व्यक्त केला जात आहे.