ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातच आता राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. एकदा कोरोना व्हायरसवर मात केल्यानंतर त्यांना पुन्हा कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, ‘माझी कोरोना चाचणी दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आली आहे. सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची घ्यावी. आवश्यक वाटत असेल, तर स्वतःची चाचणी करून घ्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.
पहिल्यांदा बच्चू कडू यांना कोरोना झाला होता तेव्हा त्यांना अस्वस्थ वाटत होते. त्यानंतर आता पुन्हा चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांच्या प्रकृतीची काळजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 20 लाख 81 हजार 520 वर पोहचली आहे. तर 51 हजार 669 जणांनी आपला जीव गमावला आहे. सद्य स्थितीत राज्यात 40 हजार 858 रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 19 लाख 87 हजार 804 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.