ऑनलाईन टीम / पुणे :
बारावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा अखेर संपली असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी – मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( बारावी) परीक्षेचा नऊ विभागांचा (पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण) निकाल उद्या म्हणजेच 16 जुलै रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार असल्याची माहिती मंडळचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली.
विद्यार्थी मंडळाच्या अधिकृत www.mahresult.nic.in, www.hscresult.mkcl.org आणि www.maharashtraeducation.com या संकेतस्थळांवर निकाल पाहू शकतील. तसेच विद्यार्थ्यांना यावरून गुणपत्रिकेची प्रिंटआऊट देखील घेता येणार आहे.
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती देखील उपलब्ध होणार आहे. तसेच कनिष्ठ महाविद्यालयांसाठी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर आपला निकाल एकत्रितपणे पाहता येईल.
ऑनलाइन निकालानंतर दुसऱ्या दिवसापासून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन स्थलांतर प्रमाणपत्रासाठी मंडळाच्या http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
गुणपडताळणीसाठी विद्यार्थी 17 ते 27 जुलैपर्यंत, छायाप्रतीसाठी 17 जुलै ते 5 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. त्यासोबत ऑनलाइन पद्धतीने शुल्क (डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यु पी आय आणि नेट बँकिंग) याद्वारे भरता येणार आहे.