मुख्यमंत्र्यांनी आज बोलवली सर्वपक्षीय बैठक, लॉकडाऊनबाबत होणार निर्णय
प्रतिनिधी / मुंबई
संपूर्ण राज्यात कडक निर्बंध लागू केल्यानंतरही कोरोना रुग्णसंख्येत वाढ कायम दिसत आहे. त्यामुळे निर्बंधानंतरही कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात न आल्यास राज्यात तीन आठवडÎांचा संपूर्ण लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या (शनिवारी) सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील उपाययोजनांबाबत या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आदी उपस्थित राहणार आहेत.
राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता तीन आठवड्यांच्या लॉकडाऊनबाबत चर्चा होणार आहे. सध्याची सक्रिय रुग्णसंख्या पाच लाखांच्या घरात आहे. पुढच्या काही दिवसात ही संख्या दहा लाखांवर पोहोचली तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. त्यामुळे लॉकडाऊनबाबत चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत विरोधी पक्षाचे मत घेतले जाईल, असे विजय वडेट्टीवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झालेला पाहायला मिळतोय. राज्यातील प्रत्येक शहरात दररोज हजारांच्या घरात कोरोना रुग्ण दाखल होत आहेत. मफत्यूदरही वाढत आहे. त्यामुळेच कडक पावले उचलण्याची गरज असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
लसींचा साठा संपला
राज्यातील कोरोनाची परिस्थिती भीषण आहे. त्यातच राज्यातील लसींचा साठाही संपल्यात जमा आहे. केंद्रांकडून लस दिली जात नसल्याचा आरोप राज्य सरकारकडून केला जात आहे. त्यातच ऑक्सिजन बेड्स, रुग्णवाहिका यांची कमतरता भासू लागली आहे. मुंबईत १२० लसीकरण केंद्रे असून त्यापैकी ९० केंद्रे लसीअभावी ठप्प आहेत. राज्यातही अनेक शहरात लसीकरण केंद्रे बंद आहेत. त्याबाबतही या बैठकीत विचार होण्याची शक्यता आहे.
लोकलही ठप्प होण्याची शक्यता
पुढच्या लॉकडाऊनमध्ये कदाचित मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनला पुन्हा ब्रेक लागण्याची शक्यता आहे. लोकलमधील गर्दी कोरोना प्रसाराचे कारण ठरत आहे, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. लोकलची गर्दी नियंत्रणात येत नसल्याने लोकल बंद करण्याचा विचारही सरकार करत असल्याचे बोलले जात आहे. एकूणच सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीचा विचार करता सध्या निर्बंधात सूट मिळणार नाही, तर निर्बंध अजून कडक केले जाऊ शकतात.