प्रतिनिधी / शिरोळ
1 मे २०२१ रोजी कामगार दिन पासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत, कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघटनेच्यावतीने इशारा देण्यात आला आहे.
शिरोळ नगर परिषद कर्मचारी संघटनेच्यावतीने कार्यालयीन प्रमुख संदीप चुडमुंगे यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी तैमूर मूलाणी यांना निवेदन देण्यात आले. कोरोना विषाणूंनी बाधित होऊन राज्यातील नगरपालिका नगरपंचायत मधील कर्मचारी मयत पावत असल्यामुळे व त्यांच्या प्रलंबित मागण्या शासनाकडे वारंवार लक्ष वेधून ही अद्याप संबंधित विभागाने दखल घेतली नाही.
गतसाली कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव वाढू नये म्हणून नगरपालिकेचे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखला होता. त्यावेळी काही प्रमाणात कर्मचाऱ्यांनाही त्याची लागण झालेली होती. परंतु सुदैवाने कोणताही जीवित हानी झालेली नाही.
सध्या कोरोनाची दुसरी लाट वाढत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणे शहरांमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या भागांमध्ये कंटेनमेंट झोन करणे ,जंतुनाशक फवारणी करणे, कोविडमुळे मयत झालेल्या व्यक्तींचे अंत्यसंस्कार करणे यासारखे कामे करावी लागत आहेत तसेच शासनाच्या आदेशान्वये शहरातील सर्व आस्थापनावर नियंत्रण ठेवणे बाजारावर नियंत्रण ठेवणे, यासाठी थेट संपर्क येत असल्याने कर्मचार्यांनाही याची लागण होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महाराष्ट्र शासनाने इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनाही विमा संरक्षण द्यावे यासह अन्य मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे यावेळी अरुण पवार, प्रभावती बाबर ,अमोल बननणे, भानुदास कांबळे ,दत्तात्रय शिंदे, प्रशांत आवळे, स्नेहल कोळी, सीमा जाधव, मल्लिकार्जुन बल्लारी आदी उपस्थित होते.