प्रतिनिधी/ येळ्ळूर
महाराष्ट्र सरकार सीमाभागातील मराठी शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच मराठीपण टिकविण्यासाठी, संस्कृती वाढविण्यासाठी आर्थिक साहाय्य करणार आहे. ज्या शाळांचा कायापालट झाला आहे, अशा शाळांना महाराष्ट्राच्या जिल्हा ग्रंथालयाचे आठ जणांचे पथक भेट देत आहे. शनिवार दि. 7 नोव्हेंबर रोजी येळ्ळूर मराठी मॉडेल शाळेला भेट देऊन पाहणी केली. शाळेच्या विकासाबद्दल त्यांनी कौतुक केले आहे.
सोलापूर जिल्हा ग्रंथालयाचे निरीक्षक प्रसाद पाटील यांनी भेट दिली व शाळेचे कौतुक केले. शाळेची शिस्त, निटनेटकेपणा आणि प्रगती पाहून शाळा सुधारणा समिती, आजी-माजी विद्यार्थी आणि गावकऱयांचे त्यांनी कौतुक केले. यावेळी येळ्ळूर एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, म. ए. समितीचे अध्यक्ष शांताराम कुगजी, शाळा शिक्षण समितीचे अध्यक्ष डी. सी. बागेवाडी, म. ए. समितीचे सदस्य रमेश मेणसे यांच्यासह प्रभारी मुख्याध्यापिका शोभा निलजकर, शिक्षिका के. डी. पाटील, मंडोळकर, कडलीकर, बाळेकुंद्री, कोलकार, शिक्षक पाखरे उपस्थित होते.
यावेळी शाळेसाठी निधी मंजूर झाला आहे. तो निधीही लवकरच दिला जाईल, असे प्रसाद पाटील यांनी सांगितले. मंजूर झालेल्या निधीची प्रत त्यांनी दाखविली. त्यामुळे लवकरच येळ्ळूर मराठी मॉडेल स्कूलला विकासासाठी महाराष्ट्राकडून निधी मिळणार आहे.