वार्ताहर/ कराड
महालक्ष्मी एक्सप्रेसमधुन प्रवास करणाऱया महिलेचे 22 तोळे सोन्याचे दगिने लुटल्याची खळबळजनक घटना कराड रेल्वे स्थानकात शुक्रवारी पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास घडली. महिलेच्या हातातील दागिने असलेली बॅग हिसकावुन चोरटय़ाने चालू रेल्वेतुन उडी मारून धुम ठोकली. या घटनेची माहिती मिळताच, कराडसह पुणे व मिरज रेल्वे पोलीस चोरटय़ांचा शोध घेत आहेत. याबाबत मिरज रेल्वे पोलिसात तक्रार झाल्याची माहिती कराड रेल्वे पोलिसांतुन देण्यात आली.
याबाबत रेल्वे पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहुन कोल्हापुरला निघालेली महालक्ष्मी एक्सप्रेस शुक्रवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास कराड रेल्वे स्थानकात आली. या रेल्वेत ठाणे यथे राहणारी महिला पती व मुलांसमवेत हातकणंगले येथे गावी जाण्यासाठी निघालेली होती. महालक्ष्मी एक्सप्रेस कराड रेल्वे स्थानकात पाच मिनिटे थांबल्यानंतर पुन्हा कोल्हापुरच्या दिशेने रवाना झाली. त्याचवेळी एक चोरटा झोपलेल्या महिलेच्या जवळ आला. व महिलेच्या हातातील सोन्याचे दागिने असलेली बॅग ओढू लागला. त्यामुळे जागे झालेल्या महिलेने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. मात्र चोरटय़ाने जोरात हिसका देऊन महिलेच्या हातातील बॅग घेऊन चालत्या रेल्वेतुन रेल्वे स्थानकाच्या विरूद्ध दिशेला उडी मारली व पोबारा केल्या. या बॅगेत 22 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे 20 हजार रूपयांची रोख रक्कम असल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेची माहिती मिळताच कराड रेल्वे पोलीस व रेल्वे एल.सी.बी.च्या पथकाने रेल्वे स्थानक व ओगलेवाडी परिसरात चोरटय़ांचा शोध घेतला. मात्र चोरटे सापडले नाहीत. या घटनेची नोंद मिरज पोलिसांत झाल्यानंतर कराड रेल्वे पोलिसांबरोबरच पुणे व मिरज रेल्वे पोलिस चोरटय़ाला शोधण्यासाठी जंगजंग पछाडत आहेत. रेल्वे स्थानक परिसरासह ओगलेवाडीतील मुख्य रोडच्या दुतर्फा असलेले सर्व सिसिटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. यासाठी कराड शहर व तालुका पोलिसांची मदत घेण्यात येत आहे. या प्रकारामुळे ओगलेवाडी परिसरात खळबळ उडाली आहे.