उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजन, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या पदाधिकारी,कार्यकर्ते, मंत्री, खासदार, आमदार राहणार उपस्थित
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या वतीने आज रविवारी (दि. 20) दुपारी 3 वाजता संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृहात मेळाव्याचे आयोजन केले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह मंत्री, खासदार, आमदार यावेळी उपस्थित राहणार आहेत.
पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. भाजपने माजी नगरसेवक सत्यजित कदम यांना उमेदवारी जाहीर करून मेळावाही घेतला. काँग्रेसनेही जय्यत तयारी केली आहे. उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचाराची सुरूवात आज रविवारी होणाऱया महाविकास आघाडीच्या मेळाव्याने केली जाणार आहे. काँग्रेससह राष्ट्रवादी, शिवसेना या घटक पक्षांच्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांना निमंत्रणे देण्यात आली आहेत. या मेळाव्यास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, शिवसेना संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह जिह्यातील महाविकास आघाडीचे खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजूबाबा आवळे, आमदार ऋतुराज पाटील, आमदार प्रा. जयंत आसगांवकर, आमदार राजेश पाटील, आमदार प्रकाश आबीटकर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, के. पी. पाटील, चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, सुरेश साळोखे, दिनकरराव जाधव, संजयबाबा घाटगे, संपतबापू पवार – पाटील, गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील-आबाजी, गुलाबराव घोरपडे, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शिवसेना शहर प्रमुख जयवंत हारुगले, महानगरपालिका, नगरपालिकांचे आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी, व शिवसेना या पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी मान्यवर नेते व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, ही माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी दिली.
शिवसैनिकांसाठी ‘मातोश्री’चा आदेश अंतिम – संजय पवार
कोल्हापूर उत्तरच्या जागेसाठी शिवसेनेचे स्थानिक नेते आग्रही होते. पण शिवसेना पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही जागा काँग्रेसकडेच राहिल, हे स्पष्ट केल्यानंतर शिवसैनिक काहीसे नाराज झाले होते. त्याविषयी जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी सांगितले, आपला उमेदवार नसणार याबद्दल शिवसैनिक नाराज होणे स्वाभाविक आहे. पण आम्हा शिवसैनिकांसाठी मातोश्रीवरून येणारा आदेश अंतिम असतो. पक्षप्रमुखांनी दिलेला आदेशानुसार महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठिशी शिवसैनिक ठामपणे राहणार आहेत, असेही पवार यांनी सांगितले.