विशाल कदम /सातारा
विधानसभा निवडणूक होऊन एक वर्ष पूर्ण झाली आहेत. तर महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येऊन ही 11 महिने झाले. त्यामुळे जिह्यात महाविकास आघाडी पक्षातल्या कार्यकर्त्यांना विविध समितीवर सदस्यपद मिळावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. कोरोनामुळे या समित्या निवडल्या गेल्या नव्हत्या. अनलॉक झाल्याने निवडीच्या अनुषंगाने फॉर्म्युला ठरला गेला आहे. ज्या जिह्यात पालकमंत्री तिथे 60 टक्के इतर दोन पक्षांना प्रत्येकी 20 टक्के असा आहे. सेनेने यादी पाठवली आहे. काँग्रेसमधील इच्छुकांनी आपली इच्छा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेटून व्यक्त केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक रेसमध्ये असले तरीही वरिष्ठ कोणावर जबाबदारी टाकतात त्याकडे लक्ष लागून राहिले आहे.
महाविकास आघाडीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस जिह्यात पुन्हा नव्या वेगाने नव्या दमाने कामाला लागले. काँग्रेसने तर कात टाकली आहे. पण शिवसेना अजून ही कुठेतरी ठेचा खात आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या तालुक्यात फक्त सेना फुल्ल चार्ज आहे तेही त्यांचा देसाई गट म्हणून कोरोनाच्या काळात सगळेच पक्ष आपापल्या कामात व्यस्त होते. परंतु नियोजनसह इतर समित्याच्या निवडी करता येत नव्हत्या. त्यामुळे इच्छा ही कार्यकर्त्यांना व्यक्त करता येत नव्हती. आता मात्र अनलॉक झाल्याने या निवडीच्या अनुषंगाने तिन्ही पक्षात हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचा फॉर्म्युला राज्यपातळीवर ठरला असून ज्या पक्षाचा पालकमंत्री त्यांना 60 टक्के, इतर पक्षांना 20 टक्के देण्याची चर्चा जिल्हा पातळीवर झाली आहे.
त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांच्याकडे अनेक इच्छुकानी मागणी केली आहे. त्यानुसार नियोजनसाठी एकूण 20 जागा आहेत. चार नामनिर्देशित सदस्य, 14 विशेष निमंत्रित सदस्य, अशा 18 जागा आहेत. चार नामनिर्देशित सदस्यांमध्ये राष्ट्रवादीचे दोन सदस्य तर काँग्रेस एक व सेना एक सदस्य असणार आहे. विशेष निमंत्रितामध्ये राष्ट्रवादीकडे 8 जागा असून सेना काँग्रेस 3, सेना 3 जागा ठरल्या आहे. विविध समितीचे वाटप ठरले आहे. राष्ट्रवादीकडून प्रत्येक तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी इच्छा व राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ कोणाला संधी देतात त्याकडे उत्सुकता लागून राहिली आहे.
काँग्रेसमध्ये अनेकांनी इच्छा केली व्यक्त
काँग्रेसमध्ये अनेक निष्ठावान कार्यकर्ते सत्ता येताच फुल्ल चार्ज झाले. कामाला लागले. एखादे चांगले पद मिळेल यासाठी प्रयत्न करू लागले. नियोजन, डोंगरी यासह विविध समितीवर निवड व्हावी अशी इच्छा काँग्रेसमधील मनोहर शिंदे, पालेकर, हिंदुराव पाटील, अशोक पाटील, ऍड. विजयराव कणसे, अविनाश फाळके, अशोकराव गोडसे, महेंद्र बेडके, विराज शिंदे, बागवान, धनश्री महाडिक यांनी मागणी केली आहे. त्यात प्रदेशकडून कोणाला संधी मिळते त्याकडे लक्ष लागून आहे.
शिवसेनेच्या याद्या तयार
शिवसेनेत कोणाला संधी द्यायची कोणाला नाही याची यादीच राज्यमंत्री शंभूराज देसाई, उपनेते प्रा. नितीन बानूगडे- पाटील, जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव, जयवंतराव शेलार आणि यशवंतराव शेडगे यांच्या बैठकीत तयार झाली आहे. जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी नियोजन समितीवर जाण्यास नकार दिला आहे. त्यांनी महामंडळाची मागणी केली आहे. दोन्ही जिल्हाप्रमुख शेलार आणि शेडगे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तसेच शारदाताई जाधव यांनी महिला संघटन केल्याने त्यांची डोंगरावर निवड होण्याची चर्चा आहे. हणमंत चवरे यांनी ही अनेक निवडणुका सेनेच्या तिकिटावर लढवल्या असल्याने त्यांच्याही नावाची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, शनिवारी दिवाकर रावते हे जिह्यात येणार असून आयोजित महत्वाच्या बैठकीत यावर खल होण्याची शक्यता आहे. येत्या आठवडाभरात मंडळाच्या निवडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.