ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्यातील कोविड साथीच्या संकटाने उग्र अवतार धारण केला असताना व सर्वत्र ऑक्सिजनची टंचाई जाणवत असताना देशात सर्वत्र ऑक्सिजन विषयी हाहा:कार माजला असल्यामुळे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली महानिर्मिती व्यवस्थापनाने तातडीने ऑक्सिजन पुरवठ्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखून अंमलबजावणी देखील सुरू केली आहे.
त्यानुसार सध्या महानिर्मितीच्या खापरखेडा,कोराडी,पारस व परळी या वीज केंद्रांमधील ओझोनायझेशन प्लांट मधून त्या-त्या परिसरातील गंभीर कोरोनाग्रस्तांना ऑक्सिजनचा पूरक पुरवठा करण्यासाठी अतिशय गतिमान पावले उचलली जात आहेत. या वीज केंद्रांद्वारे वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठा साध्य होणार आहे.
एकीकडे कोरोनाच्या आव्हानात्मक काळात महानिर्मिती सातत्यपूर्ण वीजनिर्मिती साध्य करत असल्याने अश्या आपत्कालिन परिस्थितीत राज्याला पुरेशी वीज उपलब्ध होत आहे. पण केवळ तेव्हढ्यावरच न थांबता सध्यस्थितीत महानिर्मितीच्या काही वीज केंद्रातील ओझोन प्लांट मधून परिसरातील रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा तातडीने करण्यासाठी महानिर्मितीने कंबर कसली आहे.औष्णिक वीज केंद्रात वापरल्या जाणाऱ्या पाण्यात शेवाळ-सूक्ष्मजंतू होऊ नयेत यासाठी त्या पाण्यावर रासायनिक प्रक्रिया करण्यासाठी ओझोनायझेशन प्लांट स्थापित केलेले असतात. वीजनिर्मितीवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता घेऊन अश्या प्लांट मधून काही अतिरिक्त यंत्रणा उभारून किमान ९५ टक्के शुद्धता राखून पूरक वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती होऊ शकते याचा साधकबाधक अभ्यास करून ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे मार्गदर्शनाखाली आणि महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांचे नेतृत्वाखाली महानिर्मितीची संपूर्ण यंत्रणा गतिमानतेने कामाला लागली असून महानिर्मितीचे वरिष्ठ व्यवस्थापन- अधिकारी-कर्मचारी जणू कोविड योद्धा बनून या कार्यात अविश्रांत परिश्रम करत आहेत.
याबाबतचे नुकतेच प्राप्त झालेले राज्य शासनाचे तातडीचे निर्देश व ही संकल्पना यशस्वी करण्यासाठीची प्राथमिक तांत्रिकी व प्रशासकीय शक्यता तातडीने तपासून आता महानिर्मितीने एकूण तीन स्तरावर सूक्ष्म नियोजनाद्वारे प्रत्यक्ष कार्यवाही युद्धपातळीवर सुरू केली आहे.
पहिल्या टप्प्यात महानिर्मितीच्या नवीन परळी वीज केंद्राने अवघ्या काही दिवसांत तातडीने युद्ध पातळीवर अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयाला प्रतिदिन २८८ जम्बो सिलेंडर क्षमतेचा व ९५.२ टक्के शुद्धतेचा ऑक्सिजन प्लांट उभारला. हा प्लांट २७ एप्रिल रोजी कार्यान्वित केल्याने परळी -बीड परिसरातील कोरोनाग्रस्त रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे. तसेच आता प्रति तास ८४ घनमीटर क्षमतेचा अशाच प्रकारचा प्लांट परभणी जिल्हा परिषद कोविड रुग्णालय येथे देखील उभारला जात असून तो पुढील आठवड्यात कार्यान्वित होणार आहे. अशा प्रकारे मराठवाडा या मागास प्रदेशात महानिर्मितीचे फार मोठे काम सुरू झाले आहे.