मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 16 हजारांची मद
कोल्हापूर/ प्रतिनिधी
कोरोना विरुद्धच्या युद्धात नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी डिझास्टर रिलिफ फंड व मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदतीचा ओघ सुरु आहे. उद्योजक, व्यवसायिक, लोकप्रतिनिधीकडून मदत निधी जमा केला जात आहे. यामध्ये आता महावितरणचे अधिकारी आणि कर्मचाऱयांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. महावितरणच्या कळे उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता एस.पी.पाटणकर यांनी 16 हजार रूपये मदत निधीचा धनादेश निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्याकडे सुपूर्द केला. लॉकडाऊनच्या काळात 24 तास अखंडीत वीज पुरवठा देण्याबरोबरच महावितरणच्या अधिकाऱयांकडून सामाजिक बांधिलकीही जपली जात आहे.
पाटणकर यांना एक कर्तव्यदक्ष आणि समाजभान असणारे अधिकारी म्हणून ओळखले जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात ‘लॉकडाऊन’ झाल्यामुळे पन्हाळा तालुक्यातील पडळ येथे महावितरणसाठी कार्यरत असणारे ‘ऑफशोर’ कंपनीचे 23 कर्मचारी पडळ येथेच अडकून पडले. त्यामुळे विद्युत यंत्रणा उभारणाऱया या कर्मचाऱयांची राहण्याची आणि जेवणाची अबाळ झाली. याची पाटणकर यांना माहिती समजताच त्यांनी पडळ येथे सर्व कर्मचाऱयांची राहण्याची सोय केली आहे. तसेच त्यांना अन्नधान्याचे वाटप केले. त्यामुळे परराज्यातील कर्मचाऱयांची गैरसोय टळली. आता त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 16 हजारांचा धनादेश देत कोरोना विरोधातील लढय़ाला बळ दिले आहे.