शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मान्यता
कोल्हापूर प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांना प्रोत्साहनपर निधी दिला जाणार आहे. यामध्ये रौप्यमहोत्सवी अडीच लाख, सुवर्ण महोत्सवी पाच लाख, हिरक महोत्सवी सहा लाख, अमृत महोत्सवी साडेसात लाख, शतक महोत्सवी वर्षात पदार्पण 10 लाख रूपये देण्यास व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली. विद्यापीठात झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते. सचिवपदी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे होते.
शिवाजी विद्यापीठातील अधिविभागात सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांना संगणक केंद्रात इंटर्नशिपसाठी मान्यता देण्यात आली. इंटर्नशिपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कामाचा अनुभव मिळेलच परंतू केलेल्या कामाचे प्रशस्तीपत्रकही मिळणार आहे. त्यामुळे पदवी घेतल्यानंतर लगेच विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मिळणार आहे. शिवाजी विद्यापीठाला देणगी द्यावयाची असेल तर 3 लाख रूपयांच्यापुढे रक्कम असली पाहिजे, असा पुर्वी नियम होता. त्यामुळे हा निर्णय अनेकांसाठी अडचणीचा ठरत होता. त्यामुळे येथूनपुढे 1 लाख रूपये देणगी स्विकारण्यास व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली आहे. त्याचबरोबर अनेक शासकीय, शैक्षणिक निर्णयास मान्यता देण्यात आली. या बैठकीला व्यवस्थापन परिषदेचे सदस्य ऍड. धैर्यशील पाटील, अमित कुलकर्णी, डॉ. डी. जी. कणसे, डॉ. आर. के. कामत, डॉ. योजना जुगळे, गजानन पळसे, डॉ. एम. व्ही. गुळवणी आदी उपस्थित होते.