वार्ताहर/ सदलगा
ऊस वाहतूक करणाऱया टॅक्टर ट्रॉलीला मागून दुचाकीने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे विद्यार्थी ठार झाले. तर तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला. सदर अपघात नेजनजीक नेज-नागराळ रस्त्यावर शुक्रवारी रात्री घडला. सुनील कलगोंडा पाटील (वय 18), मल्लिकार्जुन शिवनायक पुजारी (वय 18) अशी मृत युवकांची नावे आहेत. तर सुरज शिंदे हा गंभीर जखमी असून त्याच्यावर बेळगाव येथे उपचार सुरू आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी, शुक्रवारी रात्री आठच्या दरम्यान ट्रक्टर (क्र. केए 23 टीडी 1675) हा उसाने भरलेल्या दोन ट्रॉली घेऊन नागराळकडून नेजच्या दिशेने कारखान्याकडे जात होता. तर याचवेळी नेजहून सुनील पाटील, मल्लिकार्जुन पुजारी आणि सुरज शिंदे हे तिघे युवक दुचाकी (क्र. केए 23 इव्ही 9476) वरून भरधाव जात होते. दरम्यान नेज-नागरळ रस्त्यावरील अरुण सत्याप्पा माळी यांच्या शेताजवळ समोरुन जात असलेल्या ट्रॉलीचा अंदाज न आल्याने दुचाकीची उसाने भरलेल्या ट्रॉलीला जोराची धडक बसली.
या भीषण अपघातात दुचाकी चालविणारा सुनील पाटील हा जागीच ठार झाला. तर दुचाकीवर मागे बसलेले मल्लिकार्जुन आणि सुरेश हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी चिकोडीकडे रवाना केले. मात्र मल्लिकार्जुनला चिकोडीकडे उपचारासाठी नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. तर सुरेश याची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर बेळगाव येथील केएलई इस्पितळात उपचार सुरू आहेत.
अपघात घडताच ट्रक्टरचालकाने ट्रक्टर-ट्रॉली तिथेच सोडून घटनास्थळावरुन पलायन केले.