उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोनामुळे रखडलेल्या राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालयीन आणि सीईटी परीक्षांच्या आयोजनाबाबत स्वतंत्र समिती गठीत करण्यात आली असून नव्या वेळापत्रकानुसार या परिक्षा घेतल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये याची काळजी घेतली जाईल असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी जाहीर केले. राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूशी सामंत यांनी रत्नागिरीतून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.
विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटीसेलकडून पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा रद्द होणार नाहीत. विद्यार्थी आणि पालक यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. या सर्व परीक्षा नवे वेळापत्रक जाहीर करून घेण्यात येतील. याचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरु शशिकला वंजारी, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू देवानंद शिंदे, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.अभय वाघ, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे संचालक धनराज माने यांची समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती कोरोनाचा प्रादुर्भाव व स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून महाविद्यालयीन परीक्षेचे वेळापत्रक नियोजन, शैक्षणिक वर्षाचे नियोजन याचा अहवाल सादर करतील. त्यानंतर परिक्षांचे वेळापत्र जाहीर होईल असे सामंत यांनी संगितले.
विद्यापीठात मल्टीपर्पज लॅब सुरू करा
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अकृषी विद्यापीठांमध्ये विविध प्रकारच्या आजारंबाबत चाचण्या घेता येतील अशा स्वरूपाच्या मल्टिपर्पज लॅब विद्यापीठांमध्ये सुरू करण्याच्या सूचनाही सामंत यांनी यावेळी दिल्या. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात अशा प्रकारची लॅब सुरू आहे. यासाठी केंद्र शासन, राज्य शासन आणि आरोग्य विभागाच्या आवश्यक त्या सर्व परवानग्या तातडीने देण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी दिली.
एनएसएस विद्यार्थ्यांची घेणार मदत
आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्यासाठी एनएसएस विद्यार्थ्यांचीही मदत घेता येईल का याचा सर्व विद्यापीठाने विचार करावा. काही दिवसांपूर्वी सोलापूर विद्यापीठाने आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्यासाठी एक प्रयोग सुरू केला आहे. एनएसएसच्या 27 विद्यार्थ्यांना आईवडिलांकडून परवानगी घेऊन प्रशिक्षण देऊन आरोग्यसेवेच्या यंत्रणेसाठी सज्ज केले. याच धर्तीवर राज्यातील इतर विद्यापीठांमध्ये सुद्धा एनएसएसचे विद्यार्थी आरोग्य यंत्रणेच्या सेवेसाठी घेता येतील का याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही सामंत यांनी कुलगुरूंना केल्या.
मुंबई विद्यापीठाकडून ऑनलाईन समुपदेशन
कोरोनामुळे नागरिकांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने पुढाकार घेऊन केव्हिड 19 च्या उद्रेकाच्या मानसिक परिणामास सामोरे जाण्यासाठी विद्यापीठाच्या उपयोजित मानसशास्त्र विभागाने ऑनलाइन मानसिक आरोग्य सहाय्य सेवा उपलब्ध करुन दिली आहे. सहयोगी प्राध्यापक डॉ. विवेक बेल्हेकर यांनी ही ऑनलाईन समुपदेशनाची संकल्पना आखली आहे. इतर विद्यापीठांनी ही सुविधा सुरू करावी असेही सामंत यांनी यावेळी सांगितले. राज्यात अन्य खासगी विद्यापीठांशीही लवकरच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला जाणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली.
या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये उच्च तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, राज्यातील 13 विद्यापीठांचे कुलगुरू, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे संचालक धनराज माने, सीईटी सेल चे आयुक्त संदीप कदम, मुंबईतील जे. जे. स्कुल ऑफ आर्टचे संचालक राजीव मिश्रा सहभागी होते.