शिवमंदिरांत पहाटेपासून धार्मिक विधी, अभिषेक,पुजा
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर शहर व परिसरात गुरूवारी महाशिवरात्रीला शंभूमहादेवाची विविध मंदिरांत आकर्षक पुजा बांधण्यात आली. काही प्रसिद्ध मंदिरे धार्मिक विधी झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी बंद राहिली. त्यामुळे भाविकांनी मंदिराबाहेरूनच शिवलिंगाचे दर्शन घेण्यास गर्दी केल्याचे दिसून आले. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर विविध शिवमंदिरात होणाऱया महाप्रसादाला फाटा दिला आहे. पण गुरूवारी विविध शिवमंदिरांसमोर दुध, खिचडी, केळी, राजिगऱयाचे लाडूचा प्रसाद देण्यात आला. अनेकांनी घरीच
हर हर महादेव’चा गजर करत शिवपुजन करून महाशिवरात्री साजरी केली.
महाशिवरात्रीच्या पुर्वसंध्येला शहरातील शिवमंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. त्यामुळे पहाटेपर्यत मंदिर परिसर प्रकाशात उजळून निघाला. पहाटेपासून शिवमंदिरांत ओम नमःशिवाय'चा गजर सुरू झाला. या ओंकार जपातच श्रींना अभिषेक करण्यात आला. त्याची विविध रूपांत पुजा बांधण्यात आली. शिवलिलामृतातील काही अध्यायांचे वाचन निवडक भाविकांनी सकाळी 11 वाजेपर्यत केले. काही शिवमंदिरात अभिषेक होताच आरती झाली. त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आले. शुक्रवार पेठेतील रहाट गाडगे परिसरातील बाळेश्वर महादेव मंदिरात श्रीची पुजा करणारे शिवाजी महाराज यांच्या रूपात श्रींची पुजा महेश अनामकर, प्रदीप वीर यांनी बांधली. उत्तरेश्वर पेठेतील उत्तरेश्वर महादेव मंदिरात सकाळी पुजेनंतर मंदिर बंद करण्यात आले. त्यामुळे मंदिर परिसरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली.
भाविकांना दर्शनासाठी येथे शिवशंकराची प्रतिमा ठेवली होती. त्यालाच भाविकांनी बेल अर्पण केला. येथे वाघाची तालीम उत्तरेश्वर तालीम मंडळाच्यावतीने भाविकांना खिचडी, केळी वाटप करण्यात आले. त्यासाठी गर्दी झाली होती. शहरातील गंगावेश येथील ऋणमुक्तेश्वर, मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील वटेश्वर, उत्तरेश्वर पेठेतील उत्तरेश्वर, मंगळवार पेठेतील रावणेश्वर, अंबाबाई मंदिरातील अतिबलेश्वर, जोतिबा रोडवरील काशी विश्वेश्वर, कपीलतीर्थ येथील कपिलेश्वर, मंगळवार पेठेतील कैलासगडची स्वारी मंदिर, कपीलतीर्थ येथील कपिलेश्वर मंदिर, कॉमर्स कॉलेज परिसरातील दत्त भिभालिंग मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईत न्हावून निघाले. दरम्यान, यातील अधिकतर मंदिरांत गुरूवारी धार्मिक विधीनंतर मंदिर दर्शनासाठी बंद झाले. भाविकांनी बाहेरूनच शंभू महादेवाचे दर्शन घेत
हर हर महादेव’चा गजर केला. अन् पायरीवरच बेल अर्पण केला.
महाशिवरात्री निमित्त होणारा महाप्रसाद काही मंडळांनी रद्द केला आहे. पण गुरूवारी विविध शिवमंदिरांमध्ये प्रसादरूपात खिचडी, शाबुवडे, दुध, रस, केळी भाविकांना देण्यात आली. जुना बुधवार पेठेतील सिद्धेश्वर महादेव मंदिर, लिंगायत स्मशानभुमीतील सोमेश्वर मंदिर, पिंपळघाटावरील सिद्धेश्वर, उग्रेश्वर मंदिरात दर्शनासाठी गर्दी झाली. येथे स्थानिक मंडळांनी प्रसादवाटप केले.