महाराष्ट्रातील सामाजिक संस्थांचे सक्षमीकरण, व्यवस्थापन व संघटनाकरीता कार्यरत असलेल्या महा एनजीओ फेडरेशनतर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगळावेगळा दान उत्सव राबविण्यात येत आहे. केवळ पुण्यातच नव्हे, तर महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये या दान उत्सवाद्वारे 3 हजार 500 हून अधिक कुटुंबांना आधार देण्याचे काम करण्यात आले आहे.
पुण्यामध्ये मुख्य कार्यालय असलेल्या महा एनजीओ फेडरेशनतर्फे पुणे शहर-जिल्हा, मुंबई, सातारा, खंडाळा, औरंगाबाद, माण, मोशी, चाकणसह विविध शहरे व ग्रामीण भागातील कुटुंबांना अत्यावश्यक धान्य आणि वस्तू देऊन आधार दिला जात आहे.
याकरीता फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा, सहसंस्थापक विजय वरुडकर यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. फेडरेशनचे शशांक ओंबासे हे घरापासून वेगळे राहून केवळ ही मदत पोहोचविण्याचे काम करीत आहेत.
त्याचबरोबर उन्हाळ्यात भासणारी रक्ताची चणचण दूर व्हावी, याकरीता ठिकठिकाणी रक्तदान शिबीरांचे आयोजन देखील केले आहे.