श्रीलंकेच्या संसदेत दोन तृतियांश बहुमत
वृत्तसंस्था/ कोलंबो
श्रीलंकेतील ज्येष्ठ नेते महिंदा राजपक्षे यांचा तेथील संसदीय निवडणुकीत दणदणीत विजय झाला आहे. त्यांच्या श्रीलंका पीपल्स पार्टी या पक्षाला संसदेच्या 225 जागांपैकी 145 जागा मिळाल्या आहेत. त्यांच्या मित्रपक्षांना अन्य पाच जागांवर विजय मिळाला आहे. त्याचप्रमाणे श्रीलंकेच्या 26 जिल्हय़ांपैकी 22 जिल्हय़ांमध्ये त्यांच्याच पक्षाला विजय मिळाला आहे.
या विजयाबद्दल राजपक्षे यांनी श्रीलंकेच्या जनतेचे आभार मानले असून त्यांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवू अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. येत्या रविवारी राजपक्षे यांचा श्रीलंकेचे पंतप्रधान म्हणून शपथविधी होईल. ते श्रीलंकेतील या पदावर सर्वाधिक काळ राहिलेले नेते असून रविवारी ते चौथ्यांदा शपथ घेतील.
पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजपक्षे यांचे अभिनंदन केले असून दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढमूल होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. राजपक्षे यांनीही मोदींच्या अभिनंदनाला उत्तर देताना भारताशी सर्व पातळय़ांवर सहकार्य आणि मैत्री करण्याचे आश्वासन दिले. जनतेच्या आदेशानुसार आपण कार्य करणार असून भारत हा आमच्यासाठी अतिमहत्त्वाचा देश आहे, असे राजपक्षे यांनी विजयानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
विरोधी पक्षांचा धुव्वा
सांसदीय निवडणुकीत श्रीलंकेत 59 टक्के मतदान झाले होते. माजी पंतप्रधान रानी विक्रमसिंघे यांच्या युनायटेड नॅशनल पार्टी या पक्षाचा दारुण पराभव झाला. त्यांच्या पक्षाला केवळ 2 लाख 49 हजार 435 मते पडली. तर नव्याने स्थापन झालेल्या समगी जन बलवेगाया (एसजेबी) या पक्षाला 55 जागा मिळाल्या असून त्याने आपली छाप या निवडणुकीवर सोडली आहे. या पक्षाला 27 लाखांहून अधिक (23 टक्के) मतदान झाल्याचे दिसून आले.