दोडामार्गातील सर्पमित्राचे होतेय कौतुक : सापांना मारू नका, जीवदान द्या!
समीर ठाकुर / दोडामार्ग:
सध्याच्या काळात वनसंपत्ती तसेच वन्यजीव यांचे जीवन धोक्यात आले आहे. अनेक लहान-मोठय़ा वन्यजीवांची हत्या केल्या जात आहेत. त्यामुळे वन्यजीवांचे पर्यायाने मानवाचेही जनजीवन विस्कळीत होते आहे. त्यामुळे भविष्यातील धोका टाळण्यासाठी वन्यजीव तसेच विशेषतः सापांसारख्या जीवाची हत्या न करता त्यांना नैसर्गिक अधिवासात जतन करण्याची मानसिकता वाढीस लागणे गरजेचे आहे. सापांना मारू नका, त्यांना जीवनदान द्या! असे भावनिक आवाहन दोडामार्ग शहरातील सर्पमित्र राहुल विजय निरलगी या युवकाने केले आहे. शनिवारी साजरी होणाऱया नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर त्यांने हे आवाहन केले आहे.
दोडामार्ग बाजारपेठेतील 22 वर्षीय राहुलला गेल्या महिनाभरात शहर परिसरातून तसेच आसपासच्या गावातून बरेच कॉल आले. या महिनाभरात 50 च्या आसपास राहुलने अनेक जातींचे सर्प पकडले. कोब्रा-नाग, घोणस, नानाटा तसेच अन्य बऱयाच सापांना राहुल मोठय़ा कौशल्याने पकडतो व त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडतो. गेल्या काही वर्षांपासून त्याचे सर्पप्रेम कौतुकास्पद ठरले आहे. आपल्या घरात एखादा साप दिसल्यास सर्वांची घाबरगुंडी उडते. त्यातील काहीजण धिटपणाने त्या सापाला लाठय़ा-काठय़ांनी प्रसंगी दगडाने ठेचून मारतात. परंतु हे योग्य नसून सापांना मारणे म्हणजे एका मूक जीवाची हत्या केल्यासारखेच आहे. असे न करता किंबहुना नागपंचमीला म्हणजे केवळ एकाच दिवशी सर्पप्रेम न दाखवता सापांविषयी गैरसमज सोडून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडले पाहिजे. त्यांचे नैसर्गिक अधिष्ठान केले पाहिजे. चुकून जरी सर्पदंश झाला तरी आता ग्रामीण रुग्णालयात विविध औषधे-उपचार उपलब्ध आहेत. त्यामुळे घाबरून जाण्याचे तसे कारण नाही. वनविभाग तसेच अनेक सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून साप संवर्धनासाठी किंबहुना मी पकडलेल्या सापांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी चांगले प्रोत्साहन मिळते. मला साप पकडल्यानंतर जी शाबासकी किंवा जे कौतुक लोकांकडून केले जाते त्यापेक्षा सापाला न मारता त्याला कोणतीही इजा न करता पकडून नैसर्गिक अधिवासात सोडल्यास मला ते खूप आवडेल असे राहुल निरलगी यांनी शेवटी स्पष्ट केले.
सापांसाठी कायम उपलब्ध – राहुल
गेल्या काही महिन्यात मी पकडलेल्या सापांची संख्या ही लक्षणीय होती. मी किंवा अन्य सर्पमित्रांना ठिकाणाहून बोलावणे आल्यामुळे सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात शक्य झाले. थोडक्यात सापांना मारण्याचे प्रमाण घटले. 9146309694 हा माझा संपर्क नंबर असून सापांना पकडण्यासाठी कधीही संपर्क करा. मला ते आवडेल. मात्र, त्यांना मारू नका, असे राहुल यांनी स्पष्ट केले.