वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीतर्फे प्रत्येक महिन्यात सर्वोत्तम क्रिकेटपटूची निवड केली जाते पुरूष क्रिकेटपटूच्या मार्च महिन्यासाठी सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी पाकचा कर्णधार बाबर आझम, विंडीजचा कर्णधार पेग बेथवेट आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स यांची शिफारस करण्यात आली आहे. आयसीसीच्या महिलांच्या विभागासाठी इंग्लंडची गोलंदाज सोफी इक्लेस्टोन तसेच ऑस्ट्रेलियाची फलंदाज रॅचेल हेन्स आणि दक्षिण आफ्रिकेची लॉरा वुलहार्ट यांची शिफारस करण्यात आली आहे.
पुढील आठवडय़ात आयसीसीतर्फे मार्च महिन्यातील सर्वोत्तम पुरूष आणि महिला क्रिकेटपटूची या पुरस्कारांसाठी घोषणा करण्यात येणार आहे. अलिकडेच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरूद्ध मालिकेत कर्णधार बाबर आझमची फलंदाजी चांगलीच बहरली. त्याने मार्च महिन्यात झालेल्या कसोटी सामन्यात 390 धावा जमविल्या आहेत. तसेच त्याने या मालिकेतील दुसऱया सामन्यात विक्रमी 196 धावांची खेळी केली होती. त्यानंतर उभय संघात झालेल्या वनडे मालिकेतील दोन सामन्यात बाबर आझमने 57 आणि 114 धावा जमविल्या होत्या.
विंडीजचा कर्णधार ब्रेथवेटने इंग्लंडविरूद्ध झालेल्या कसोटी मालिकेत 85.25 धावांच्या सरासरीने 341 धावा जमविल्या. या मालिकेतील दुसऱया कसोटीत ब्रेथवेटने 160 धावांची खेळी केली होती. ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने विंडीजविरूद्ध कसोटी मालिकेत गोलंदाजी आणि फलंदाजीतही उपयुक्त कामगिरी केली. कमिन्सने पाकविरूद्ध कसोटीत पहिल्या डावात 56 धावांत 5 तर दुसऱया डावात 23 धावांत 3 गडी बाद करून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला होता. या मालिकेत कमिन्सने 22.50 धावांच्या सरासरीने 12 गडी बाद केले आहेत.
महिलांच्या विभागात इंग्लंडच्या इक्लेस्टोनची या पुरस्कारांसाठी दुसऱयांदा शिफारस करण्यात आली आहे. न्यूझीलंडमध्ये झालेल्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इक्लेस्टोनने आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर इंग्लंड संघाला अंतिम फेरीत नेले होते. तिने मार्च महिन्यामध्ये 12.85 धावांच्या सरासरीने 20 बळी बाद केले आहेत. ऑस्टेलियाच्या हेन्सने महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आठ सामन्यांतून 61.28 धावांच्या सरासरीने 429 धावा जमवत आपल्या संघाला या स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेच्या वुलहार्टने महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत 54.12 धावांच्या सरासरीने पाच अर्धशतकांसह 433 धावा जमवीत दक्षिण आफ्रिकेला उपांत्य फेरीपर्यंत नेले होते.