सर्वसामान्यांना बसतेय दरवाढीची झळ
प्रतिनिधी / बेळगाव
एकीकडे लॉकडाऊनमुळे आर्थिक गणित जमविताना नाकीनऊ येत असतानाच दुसरीकडे इंधन दरवाढीची झळ सोसावी लागत आहे. मागील महिन्याभरात पेट्रोल व डिझेलचे दर तब्बल दहा रूपयांनी वाढले आहेत. मागिल काही महिन्यांमध्ये पहिल्यांदाच इतकी दर वाढ झाली आहे. यामुळे वाहनांमध्ये पेट्रोल भरताना चार वेळा विचार करण्याची वेळ वाहनचालकांवर आली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे वाढलेले दर व देशातील कोरोनाची स्थिती यामुळे दर वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. जून महिन्याच्या 7 तारीख पासून दररोज 50 ते 60 पैशांनी पेट्रोल व डिझेलची दर वाढ होत होती. जून महिन्यात पेट्रोलचे दर प्रति लिटर 73 रूपये तर डिझेलचे दर प्रति लिटर 66 रूपये इतके होते. लॉकडाऊनच्या काळात स्थिर असणारे दर वाढू लागल्याने वाहनचालकांमध्ये नाराजी होती.
जून महिन्यात होणारी दर वाढ जुलै महिन्यात मात्र काहीशी कमी झाली. तरीही काही प्रमाणात ही वाढ सुरूच आहे. मंगळवारी बेळगावमध्ये पेट्रोल 82.93 तर डिझेल 76.76 दराने विक्री केले जात होते. यामुळे इंधनाच्या दरात अवघ्या महिन्याभरात 10 रूपयांची वाढ झाली आहे. याचा परिणाम वाहतुकीवर देखील होऊ लागला आहे. यामुळे वाहतुक करणाऱया वाहन चालकांना भाडे वाढविण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.