नवी दिल्ली / वृत्तसंस्था
येत्या महिन्याभरात आणखी 17 राफेल लढाऊ विमाने भारताला मिळणार आहेत. या लढाऊ विमानांमुळे भारतीय वायुदलाची ताकद वाढणार असून ही विमाने पश्चिम बंगालमधील हशिमारा एअरबेसवर तैनात केली जाणार आहेत. राफेल लढाऊ विमानांची ही दुसरी स्क्वॉड्रन असून पहिली राफेल स्क्वॉड्रन अंबाला हवाई तळावर तैनात केली गेली आहे. हशिमारा एअरबेस चीन-भूतान ट्रायजंक्शन जवळ आहे. भविष्यात चीनकडून काही आगळीक केली गेली तर त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी ही विमाने सुसज्ज होणार आहेत. एप्रिलच्या मध्यापर्यंत राफेल लढाऊ विमानांचे दुसरे स्क्वॉड्रन कार्यरत होत असल्याचे समजते.
पहिल्या टप्प्यात पाच राफेल लढाऊ विमाने 29 जुलै रोजी भारतात दाखल झाली होती. त्यानंतर 3 नोव्हेंबर रोजी 3 विमाने आणि 27 जानेवारी रोजी आणखी तीन राफेल हवाई दलात दाखल झाली होती. आतापर्यंत 11 राफेल भारताला मिळाली आहेत. संसद अर्थसंकल्पीय अधिवेशनात संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी मार्च-एप्रिलमध्ये 17 राफेल भारताला मिळणार असल्याचे आणि पुढच्या एप्रिलपर्यंत सर्व 36 राफेल वायुदलात दाखल होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारने फ्रान्सच्या कंपनीकडून 59 हजार कोटींमध्ये ही 36 विमाने खरेदीचा करार केला आहे.