गणेबैल शाळेत विभागीय अंगणवाडय़ांमार्फत कार्यक्रमांचे आयोजन
खानापूर / वार्ताहर
केंद्र शासनातर्फे सप्टेंबर महिना हा पौष्टिक आहार मासाचरण महिना म्हणून साजरा करण्यासाठी महिला आणि बालकल्याण खात्याच्यावतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन महिनाभर केले जात आहे. हा कार्यक्रम स्तुत्य असून गर्भवती महिलांना व बालकांना त्यांच्या पौष्टिक आहाराची जाणीव व्हावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा मुख्य हेतू म्हणजे आई-वडिलांनी आपल्या मुलांना घरामध्ये पौष्टिक पदार्थ दिले पाहिजेत. शिवाय आईने बाळाला सहा महिने दूध पाजणे अत्यंत गरजेचे आहे. कडधान्य भाजी करताना मोड काढून भाजी करावी. कच्चा भाजीपाला खावा, एकंदरीत मुलांमध्ये कुठल्याही जीवनसत्वाचा अभाव पडता कामा नये, याची प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. शिवाय या कार्यक्रमांतर्गत गर्भवती महिलांचा चोळी करण्याचा सन्मान, बालकांचे वाढदिवस साजरा करण्याचे सौजन्य हाती घेण्यात आल्याने महिला सन्मानाचा हा कार्यक्रम सार्वत्रिक होत असल्याचे विचार गणेबैल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. कुडची यांनी बोलताना व्यक्त केले. गणेबैल विभागातील विविध अंगणवाडय़ांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महिला आणि बालकल्याण खात्याच्या अनुषंगाने आयोजित पौष्टिक आहार मासाचरण दिनानिमित आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रा. पं. अध्यक्ष नानू नार्वेकर होते. त्यांनी या कार्यक्रमाची आपल्या भाषणात स्तुती केली
प्रास्ताविक सुपरवायझर सहशिक्षिका कुरणे यांनी केले. प्रमुख पाहुणे ग्रा. पं. सदस्य महादेव गुरव, एसडीएमसी चेअरमन भैरू गुरव, लक्ष्मी नार्वेकर, रेणुका नाईक, संदीप गुरव, मल्हारी मोरे, सीआरपी गोविंद पाटील आदी उपस्थित होते. दीपप्रज्वलन भैरू गुरव, लक्ष्मण मोरे, श्रीमती पेडणेकर आदींच्या हस्ते झाले. स्वागत मुख्याध्यापक एस. टी. पाटील यांनी केले. आभार लक्ष्मी होसूरकर यांनी मानले.