वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संयुक्त अरब अमिरातमध्ये 4 ते 9 नोव्हेंबर दरम्यान होणाऱया महिलांच्या टी-20 चॅलेंज क्रिकेट स्पर्धेत हरमनप्रित कौर, मिताली राज आणि स्मृती मानधना यांची विविध तीन संघांच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. महिलांच्या या मिनी लीग क्रिकेट स्पर्धेसाठी थायलंडची नथाकन चांथमला पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे.
या स्पर्धेत एकूण तीन संघांचा समावेश आहे. हरमनप्रित कौरकडे सुपरनोव्हाज संघाचे तर स्मृती मानधनाकडे ट्रेलब्लेझर्सचे तसेच मिताली राजकडे व्हेलॉसिटी संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. गेल्यावर्षी या स्पर्धेत भारतीय महिला संघातील हरमनप्रित कौर, मिताली राज आणि स्मृती मानधना या तीन क्रिकेटपटूंनी वरील संघांचे कर्णधारपद भूषविले होते. थायलंडची महिला क्रिकेटपटू चांथम हिने चालू वर्षीच्या प्रारंभी ऑस्ट्रेलियात झालेल्या महिलांच्या टी-20 विश्व़चषक क्रिकेट स्पर्धेत अर्धशतक झळकविले होते. थायलंड संघाकडून अर्धशतक नोंदविणारी चांथम ही पहिली महिला क्रिकेटपटू ठरली.
सध्या संयुक्त अरब अमिरातमध्ये आयपीएल क्रिकेट स्पर्धा खेळविली जात आहे. दरम्यान या स्पर्धेतील प्लेऑफ कालावधीत महिलांची टी-20 चॅलेंज क्रिकेट स्पर्धा घेतली जाणार आहे. या स्पर्धेतील सलामीचा सामना 4 नोव्हेंबरला सुपरनोव्हाज आणि व्हेलॉसिटी यांच्यात खेळविला जाणार आहे. या स्पर्धेत अंतिम सामन्यासह एकूण 4 सामने खेळविले जातील. महिलांच्या या मिनी लीग टी-20 स्पर्धेत इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, विंडीज आणि न्यूझीलंडच्या अव्वल महिला क्रिकेटपटूंचा समावेश आहे. या स्पर्धेत एकूण तीन संघांचा सहभाग असून प्रत्येक संघामध्ये चार विदेशी क्रिकेटपटूंचा समावेश राहील. कोरोना महामारीमुळे महिलांच्या या स्पर्धेवर साशंकतेचे सावट निर्माण झाले होते पण सदर स्पर्धा निश्चितपणे घेण्याचा विश्वास बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी यापूर्वीच व्यक्त केला होता. भारतीय महिला क्रिकेट निवड समिती प्रमुखपदी नीतू डेव्हिडची नियुक्ती केल्यानंतर सदर स्पर्धेचे स्वरूप निश्चित करण्यात आले.
विंडीजची डॉटिन, इंग्लंडची इक्लेस्टोन आणि डॅनियली वॅट, लंकेची चमारी अटापटू, शशिकला सिरीवर्धने, दक्षिण आफ्रिकेची आयाबोंगा खाका, बांगलादेशच्या जहानआरा आलम आणि सलमा खातून यांचा या स्पर्धेत सहभाग राहणार आहे. त्याचप्रमाणे विंडीजची सेलमन, दक्षिण आफ्रिकेची लुस आणि व्हाईट फर्न्स यांचाही या स्पर्धेत समावेश राहणार आहे. तीन विविध संघांमध्ये भारताच्या सुमारे 30 महिला क्रिकेटपटू सहभागी होत आहेत. या स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेटपटू 13 ऑक्टोबर रोजी मुंबईत एकत्रित येणार आहेत. त्यानंतर या महिला क्रिकेटपटूंना किमान एक आठवडय़ांसाठी क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल तसेच त्यांच्या कोरोना चांचणी वेळोवेळी घेण्यात येतील. 22 ऑक्टोबरला भारतीय महिला क्रिकेटपटू संयुक्त अरब अमिरातला रवाना होतील. या स्पर्धेतील सामने शारजामध्ये खेळविले जाणार आहेत.
सुपरनोव्हाज- हरमनप्रित कौर (कर्णधार), जेमी रॉड्रिग्ज, अटापटू, प्रिया पुनिया, अनुजा पाटील, राधा यादव, तानिया भाटिया, शशिकला सिरीवर्धने, पुनम यादव, शकिरा सेलमन, अरूंधती रेड्डी, पुजा वस्त्रकर, आयुशी सोनी आणि मुस्कान मलिक.
ट्रेलब्लेझर्स- स्मृती मानधना (कर्णधार), दिप्ती शर्मा, पुनम राऊत, रिचा घोश, डी. हेमलता, परवीन, राजेश्वरी गायकवाड, हर्लिन देओल, झुलन गोस्वामी, सिमरन दिल बहादूर, सलमा खातून, इक्लेस्टोन, एन. चांथम, डॉटिन आणि के. गौतम.
व्हेलॉसिटी- मिताली राज (कर्णधार), वेदा कृष्णमूर्ती, शेफाली वर्मा, सुषमा वर्मा, एकता बिस्त, मानसी जोशी, शिखा पांडे, देविका वैद्य, एस.दिव्यदर्शनी, मनाली दाक्षिणी, कॅस्पेरेक, वॅट, लुस, जहानारा आलम आणि अनघा.
4 नोव्हेंबर- सुपरनोव्हास वि. व्हेलॉसिटी, 5 नोव्हेंबर- व्हेलॉसिटी वि. ट्रेलब्लेझर्स, 7 नोव्हेंबर- ट्रेलब्लेझर्स वि. सुपरनोव्हास, 9 नोव्हेंबर- अंतिम सामना. सामन्यांची वेळ- भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता.