वृत्त संस्था/ दुबई
दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळल्याने अनेक आफ्रिकन देशांनी आपल्या हवाई वाहतुकीवर नव्याने निर्बंध घातले आहेत. या कारणास्तव हरारेमध्ये शनिवारपासून सुरू होणारी महिलांच्या आयसीसी विश्वचषक पात्र फेरीतील स्पर्धा रद्द केल्याची घोषणा आयसीसीने शनिवारी केली.
2022 साली होणाऱया आयसीसीच्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत स्थान मिळविण्याकरिता नऊ संघांचा समावेश असलेल्या पात्र फेरीची स्पर्धा झिम्बाब्वेत आयोजित केली होती. पण कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेला रूग्ण दक्षिण आफ्रिकेत आढळला असून त्याचा फटका या स्पर्धेला बसला. 2022 साली न्यूझीलंडमध्ये होणाऱया महिलांच्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, पाक, विंडीज आणि बांगलादेश हे संघ थेट प्रवेश करतील. सदर स्पर्धा 4 मार्च ते 3 एप्रिल 2022 दरम्यान होणार आहे.