वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फिफाच्या 17 वर्षांखालील वयोगटाची महिलांची विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा भारतात होणार आहे. देशामध्ये कोरोना परिस्थिती बिकट होत असून कोव्हिड-19 चा प्रसार झपाटय़ाने वाढत असल्याने वरील महिलांची विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा बंदीस्त स्टेडियममध्ये घेतली जाण्याची शक्यता अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनचे सरचिटणीस कुशल दास यांनी वर्तविली आहे.
या स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याची संधी भारताला मिळाली आहे. दरम्यान कोरोना महामारी समस्येमुळे सदर स्पर्धा यापूर्वी लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता सदर स्पर्धा पुढील वर्षी 17 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान घेतली जाईल. 2017 साली फिफाची 17 वर्षाखालील वयोगटातील पुरूषांची विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा भारताने मोठय़ा प्रमाणात यशस्वी केली होती. कोरोना परिस्थितीत सुधारणा न झाल्यास महिलांची विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा बंदीस्त स्टेडियममध्ये खेळविण्याचा निर्णय कदाचीत घ्यावा लागेल, असेही कुशल दास यांनी म्हटले आहे.