ऑनलाईन टीम / नवी मुंबई
गेले काही दिवस मुस्लिम महिलांची बदनामी करण्याच्या उद्देशाने गिटहब प्लॅटफार्मच्या बुली बाई या अॅपची निर्मिती करण्यात आली असून या अॅपद्वारे मुस्लिम महिलांची बदनामी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस सायबर सेलने बंगळुरु येथून एका 21 वर्षीय युवकाला ताब्यात घेतले आहे. तो इंजिनिअरींगचे शिक्षण घेत आहे. सध्या मुंबई पोलिसांनी आरोपीबाबत अधिकची माहिती दिलेली नसली तरी संबधित आरोपीला मुंबई आणले जात असल्याचे मात्र स्पष्ट आहे.
या प्रकरणावरुन शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी तक्रार केली असून केंद्रीय आयटी विभागाने बुली बाई या अॅप्सला ब्लॉक केले आहे. तसेच आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी रात्री प्रियंका गांधींनी ट्विट करत अॅपला बंदी घातल्यात आल्याची माहिती दिली आहे. तर दिल्ली पोलिसांनी गिटहब प्लॅटफार्मकडून या अॅप्स डेव्हलपर्स विषयी अधिकची माहिती घेत असून ट्विटला याविषयी असलेले आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास देखील पोलिसांनी सांगितले आहे.
महिलांचे फोटो एडिट करुन आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आयपीसी कलम 153- ए ( धार्मिक आधारावर दोन समुदायामध्ये भेदभाव), कलम 153-बी ( जाणूनबुजून धार्मिक भावना दुखावणे), 354-डी ( पाठीमागे लागणे), 509 (महिलांची बदनामी करण्याचा प्रयत्न) आणि कलम 500 (अपराधिक मानहानी) या कलमाखाली मुंबई सायबर सेलने गुन्हा दाखल केला आहे. सोबतच आयटी कलम 67 (इंटरनेटवर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करणे) या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.