विशाल कदम / सातारा :
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे, कर्म करत रहा फळ निश्चित मिळेल, या उक्तीप्रमाणे शुन्यातून विश्व निर्माण करणाऱ्या शिरवळच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महिला सरचिटणीस सुजाता बावडेकर. यांनी मोठय़ा जिद्दीने मोठया ध्येयाने प्रेरीत होवून स्वतः पुढे होवून काम करत राहिल्या अन् गौरी गणपतींचा कारखाना शिरवळमध्ये सुरु केला. तेथून त्या पुण्यात गौरीगणपती विक्री करतात. त्यांनी आजपर्यंत अनेक महिलांना आधार दिला. त्यांना आर्थिक उन्नतीसाठी सन्मार्ग दाखवला. आज त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा सरचिटणीस या पदावरुन चांगले काम करत आहेत.
इच्छा असेल तर मार्ग दिसेल याप्रमाणे राजमाता जिजाऊ, सावित्रीमाई फुले, अहिल्यादेवी होळकर यांचे चरित्र सुजाताताईंनी पुणे येथे शिक्षण घेताना वाचले होते. त्यांचे शिक्षण पुणे येथील एसएनडीटी कॉलेजमध्ये झाले असून त्यांचा विवाह 1997 ला नवनाथ बावडेकर यांच्यासोबत झाला अन् त्या शिरवळला आल्या. सासरी आल्यानंतर एक गृहिणी म्हणून आपण खूप काही करु शकतो. आपल्या कुटुंबासाठी आपल्या समाजासाठी हे त्यांनी जाणलं. त्यांचे वडिल गंगाराम मारुती कुंभार व आई शांताबाई कुंभार यांच्याकडून आत्मसात केलेली गौरीगणपती तयार करण्याची कला त्यांनी शिरवळ येथेही सुरु केली. छोटेखानी गौरीगणपती तयार करण्याचा कारखाना सुरु केला. अन् कुटुंबाला हातभार लागू लागला. शिरवळ येथे त्यांच्या घरात तयार केलेले गौरीगणपती हे पुण्यातून चांगली मागणी होवू लागली. तुळशी बागेत त्यांचा चांगला जम बसला. आपण महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे या ध्येयाने झपाटलेल्या सुजाताताईंनी मग 2005 साली फिरंगाई महिला बचतगटांची स्थापना केली. बचतगटाच्या माध्यमातून महिला जोडल्या गेल्या. त्यातून बँकेचे व्यवहार कसे करायचे हे महिलांना त्यांनी शिकवले अन् महिलांच्या सुखदुखात त्या सहभागी होत राहिल्या. महिला बचतगटांच्या माध्यमातून त्यांना अनेक चांगल्या मैत्रिणी मिळाल्या. अधिकारी चांगल्या भेटल्या. त्यामध्ये अंबिका देशमाने, सीमा तावरे, हेमा शेटय़े, वनिता पवार यांचा समावेश आहे. महिलांसाठी विविध उपक्रम राबवण्याच्या हेतूने हिरकणी बहुउद्देशीय सामाजिक संस्था सुरु केली. त्या संस्थेच्या माध्यमातून महिला व मुलींसाठी शिरवळ येथे शिवणकाम, पार्लर, कराटे यासारखे मोफत कोर्सेस दिले जात आहेत.
राजकीय कारकिर्द
राजकिय कोणताही वारसा नव्हता. परंतु सुजाताताईंनी जो समाजसेवेचा वसा घेतला होता त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा संमिद्रा जाधव यांच्यामुळे त्या राजकारणात सक्रीय झाल्या. राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई यांच्या विचारांनुसार त्या काम करत असून महागाई विरोधात आंदोलने, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलने करुन महिलांच्या हक्कासाठी त्या लढल्या. अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांना मदत, कोरोना काळात रुग्णांना मदत त्यांनी केली. जागतिक महिला दिनावेळी विविध उपक्रम राबवण्यात आले. 2019 पासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला सरचिटणीस या पदावर कार्यरत आहेत.
सासऱ्यांचे स्वप्न केले साकार
सुजाताताई सुशिक्षित असल्याने परिस्थितीवर मात करण्यासाठी शिक्षण हेच महत्व जाणून त्यांनी कामाला लागल्या. सासरे विठ्ठल महादेव बावडेकर हे गेली चाळीस वर्ष दुसऱयाच्या भट्टीवर मुकादम म्हणून होते. त्यांचे स्वप्न होते की स्वतःची भट्टी असावी. ते त्यांनी पुर्ण केले. त्यामध्ये त्यांचे पती नवनाथ बावडेकर यांचाही मोलाचा वाटा आहे. मुलांना चांगले शिक्षणही त्यांनी दिले आहे. पुण्यात मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देवून इंजिनिअर केले आता तो चांगल्या जॉब करतो आहे तर मुलगी पदवीच्या दुसऱया वर्षांत शिकते आहे. शिक्षणाचे महत्व जाणले म्हणून आज सुजाताताई एवढय़ा मोठय़ा पदापर्यंत पोहचल्या आहेत.