लंडन
या वर्षाच्या अखेरच्या टप्प्यात महिलांची तिरंगी मालिका आयोजित करण्यासाठी इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळ भारत व दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळांशी बोलणी करीत असल्याचे सांगण्यात आले.
भारतीय महिला संघ इंग्लंडमध्ये द्विदेशीय मालिका खेळण्याचे याआधी ठरले होते. त्यात 3 वनडे व 3 टी-20 सामने होणार होते. पण ती मालिका लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला गेला. कोरोना महामारीच्या संकटानंतर मार्चपासून संपूर्ण क्रीडा जगत ठप्प झाले आहे. ऑस्ट्रेलियात झालेली महिलांची टी-20 विश्वचषक स्पर्धा ही त्याआधी झालेली सर्वात मोठी स्पर्धा होती. या वर्षात महिलांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने होतील, अशी अपेक्षा ईसीबीचे प्रमुख कार्यकारी टॉम हॅरिसन यांनी केली आहे. भारतीय उपखंडात कोरोनाचा प्रकोप वाढला असून त्यावर ते लवकरच मात करतील आणि भारतीय तसेच दक्षिण आफ्रिका संघाला तिरंगी मालिकेसाठी आम्ही येथे आणू शकेन, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.