स्केटबोर्डिंगची तिन्ही पदके टिनेजर्सना!
महिलांच्या पार्क स्केटबोर्डिंग फायनलमधील तिन्ही पदके अपेक्षेप्रमाणे टिनेजर्सनी जिंकली. जपानची 19 वर्षांची साकुरा योसोझुमी सुवर्ण, 12 वर्षांची कोकोना हिराकी रौप्य तर 13 वर्षांची स्काय ब्राऊन ही कांस्य पदकाची मानकरी ठरली.
साकुरा योसोझुमीने अपेक्षेप्रमाणे यजमान देशाचे या इव्हेंटवरील वर्चस्व अबाधित राखले. 19 वर्षीय योसोझुमीने ऍरियाके अर्बन स्पोर्ट्स पार्कवर झालेल्या या फायनलमध्ये 60.09 गुण कमावले आणि सुवर्ण जिंकण्यासाठी ते पुरेसे ठरले.
हिराकीला 59.04 गुणांसह सुवर्ण हुकले असले तरी ती 1936 नंतरची पहिलीच युवा ऑलिम्पिक पदकविजेती ठरली. यापूर्वी 1936 मध्ये प्रेंच रोव्हर नोएलने कमी वयात ऑलिम्पिक पदक जिंकले होते. ब्राऊन ही ब्रिटनची सर्वात युवा पदकविजेती उत्तम बहरात होती. मात्र, 56.47 गुणांसह ती तिसऱया स्थानापर्यंत झेपावू शकली.
जागतिक क्रमवारीतील अव्वलमानांकित मिसुगू ओकामोतोची मात्र येथे सपशेल निराशा झाली. सर्व तिन्ही रन्समध्ये तिला अपेक्षित सूर सापडला नाही आणि एकत्रित तालिकेत चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले. जपानने पुरुष व महिला गटातील स्ट्रीट टायटल्स जिंकली असून स्केटबोर्डिंगमध्ये त्यांच्या खात्यावर 9 पैकी 5 पदके नोंद झाली आहेत. अल्ट्रा यंग फिल्डला प्रेरित करण्यासाठी ऑलिम्पिकमध्ये 4 नवे खेळ यंदा समाविष्ट केले गेले असून त्यात स्केट बोर्डिंगचा प्राधान्याने समावेश आहे. 20 स्पर्धकांपैकी फक्त 8 ऍथलिट 20 व त्याहून अधिक वर्षे वयाचे होते.
ब्राऊन (13 वर्षे, 28 दिवस) आणि हिराकी (12 वर्षे, 343 दिवस) हे यावेळी ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात तरुण चॅम्पियन्स बनण्याचा 85 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढण्यासाठी प्रयत्नशील होते. सध्या हा विक्रम अमेरिकन डायव्हर मार्जोरी गेस्ट्रिंगच्या खात्यावर आहे. गेस्ट्रिंगने 13 वर्षे 268 दिवस वय असताना 1936 बर्लिन ऑलिम्पिकमध्ये यश संपादन केले होते.
ब्रिटनची सर्वात युवा ऑलिम्पियन ठरलेली ब्राऊन येथे पदकाची दावेदार म्हणून उतरली असली तरी वर्षभरापूर्वी झालेल्या भीषण अपघातामुळे तिच्यासमोर जीवाचे संकट उभे ठाकले होते. मनगट, हाताला प्रॅक्चर होते. जर पूर्वनियोजित रुपरेषेनुसार, टोकियो ऑलिम्पिक गतवर्षीच झाली असती तर ब्राऊन त्यावेळी सहभागी होऊ शकली नसती. जापनीज आई व ब्रिटीश वडील असलेल्या ब्राऊनने 2019 मध्ये ब्रिटनचे प्रतिनिधीत्व करणे अधिक पसंत केले.