अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचे आवाहन : महिला संसद कार्यक्रमाचा समारोप
प्रतिनिधी /पणजी
महिलांनी आरोग्य सांभाळून कुटुंब घडवण्यासाठी काम करावे आणि भावी पिढीला देखील बळ द्यावे. तीच महिलांची मोठी जबाबदारी आहे. घर हे स्त्राr पुरुष दोघांचे असते. एकमेकांचा सन्मान करून घर चालवावे, आणि मुलांना घडवावे. तसेच योग्य ते परिवर्तन करून आदर्श मूल्ये जोपासावीत, असे आवाहन अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी केले.
बांबोळी येथील शामाप्रसाद मुखर्जी स्टेडीयममध्ये आयोजित करण्यात आलेल्या महिला संसद कार्यक्रमाच्या समारोपात प्रमुख पाहुणे या नात्याने त्या बोलत होत्या. गोवा सरकार, गोवा विधानसभा आणि एमआयटी स्कुल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आखण्यात आला होता. त्याचा समारोप झाला. त्यावेळी वीजमंत्री नीलेश काब्राल, संसदेचे निमंत्रक राहुल कराड, उद्योजक नानीक रुपानी व इतर मान्यवर उपस्थित होते.
स्त्राr पुरुष हा भेद बाजूला ठेवून महिलांनी आपले अस्तित्व टिकवावे. महिला पुरुषांपेक्षा श्रेष्ठ आहेत. त्यांचे सक्षमीकरण झाले तर गोव्यातील महिला राजकारणात सक्रिय होतील, असा दावा काब्राल यांनी केला.
राहुल कराड म्हणाले की, महिला सक्षमीकरणासाठी भरविण्यात आलेल्या या संसदेत गोव्यातील हजारो महिला सहभागी झाल्या आहेत. त्यांनी मोठी स्वप्ने पाहून जीवनाची वाटचाल करावी. आज सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. यामध्ये त्यांना अनुभव आला व त्याच्या जोरावर त्यांनी उंच भरारी घ्यावी.
समारोप कार्यक्रमात अनेकांची भाषणे झाली. त्यात अरुंधती भट्टाचार्य, डॉ. हर्षता पांडे, निशिता रजपूत, हेमा सरदेसाई, प्रीती भरद्वाज, या विविध क्षेत्रातील नामवंत महिलांचा समावेश होता. महिलांचा सहभाग तेथे असतो तेथे यश निश्चित असते, स्त्राrया आत्मनिर्भर, यशवंत, सुशिक्षित, विकसित होतील तेव्हाच भारत देश परिपूर्ण होईल. महिलांनी स्वतःला कमी न समजता विविध कार्यात झोकून द्यावे, असे विचार त्यांनी प्रकट केले. बुद्धिबळपटू भक्ती कुलकर्णी यांनीही त्यावेळी भाषण केले. गोव्यातील विविध महिला संस्था संघटना यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. गौतम बापट व पौर्णिमा बागची यांनी सूत्रसंचालन केले.