ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्यातील महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटना आणि मंदिरे उघडण्यास परवानगी न देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे 12 व 13 ऑक्टोबर रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष उमा खापरे, प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
केशव उपाध्ये म्हणाले की, महाआघाडी सरकारने मदिरालये उघडण्यास परवानगी दिली मात्र, अजूनही मंदिरे उघडण्यास परवानगी दिलेली नाही. त्यांच्या या निर्णया विरोधात 13 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येणार आहे.
भाजपच्या प्रदेश अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी येथे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात संत, महाराजांच्या बरोबर मंदिरांवर उपजीविका अवलंबून असणारी छोटी व्यावसायिक मंडळीही सहभागी होणार आहेत.
प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ म्हणाल्या की, महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून तरुणी, महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. मात्र, मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडून याबाबत दखल घेतली जात नाही. म्हणून या संवेदनशील सरकारच्या विरोधात 12 ऑक्टोबर रोजी राज्यभर आंदोलन केले जाणार आहे.
- कृषी कायद्याच्या स्वागतासाठी आनंदोत्सव
मोदी सरकारने केलेल्या 3 कृषी कायद्यांचे स्वागत करण्यासाठी राज्यभर आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्याचा प्रारंभ 12 ऑक्टोबर रोजी पुणे जिल्ह्यातील वरवंड ते चौफुला अशी ट्रॅक्टर यात्रा काढून होणार आहे. या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सहभागी होणार आहेत, अशी माहितीही उपाध्ये यांनी यावेळी दिली.