मिरज तालुका शिक्षक समन्वय समितीची मागणी
प्रतिनिधी / मिरज
ग्रामपंचायत निवडणूक 2020 च्या कामकाजातून महिला, अपंग, गंभीर आजारी व 53 वर्षांवरील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना वगळण्यात यावे, अशी मागणी मिरज तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीने तहसिलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. बीएलओ शिक्षकांनाही निवडणूक कामातून मुक्त करावे, अशी मागणीही करण्यात आली.
सध्या जिह्यातील ग्रामपंचायतीचे बिगुल वाजले आहे. मिरज तालुक्याच्या 22 ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. नेहमीप्रमाणे शासन निवडणूक कामासाठी शिक्षकांची नियुक्ती करुन त्यांच्यावर अतिरीक्त कामाचा भार टाकला जातो. मात्र, महिला, अपंग आणि दिर्घ आजारी शिक्षकांनाही निवडणुकीची कामे दिली जातात. त्याला प्राथमिक शिक्षक समितीचा विरोध असून, ग्रामपंचायत निवडणूक कामी मिरज तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना आदेश देताना शिक्षकांच्या बरोबरच इतर संवर्गातील कर्मचारी समप्रमाणात घ्यावेत, बीएलओ म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांचे काम काढून घ्यावे. तसेच आजारी, अपंग आणि महिला शिक्षकांना निवडणूक कामातून वगळावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.