म. ए. समितीला मतदान करण्याचे केले आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
म. ए. समिती महिला आघाडीच्यावतीने मध्यवर्ती म. ए. समितीचे उमेदवार शुभम शेळके यांचा जोरदार प्रचार करण्यात आला. शहरातील महिला मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना समितीलाच मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. महिलांचा प्रतिसाद समितीलाच असल्याच्या भावना महिला मंडळांच्या पदाधिकाऱयांनी व्यक्त केल्या.
होसूर येथील मराठा महिला मंडळ, लक्ष्मी महिला संघ, मठ गल्ली येथील सिद्धकला महिला संघ, गणेश महिला संघ, नार्वेकर गल्ली येथील ओम प्रगती महिला मंडळ, कंग्राळ गल्ली येथील एकता महिला मंडळ आणि रेणुकादेवी महिला मंडळ, जाधवनगर येथील मराठा महिला मंडळ, माळी गल्ली येथील शिवाई महिला मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटी घेण्यात आल्या.
यावेळी महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर, माजी महापौर सरिता पाटील, माजी महापौर संज्योत बांदेकर, माजी उपमहापौर रेणू मुतगेकर, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, रूपा नेसरकर, प्रिया कुडची, भाग्यश्री जाधव, प्रभावती सांबरेकर, इंदू पाटील, अर्चना कावळे, रेखा गोजगेकर यांच्यासह महिला आघाडीच्या सदस्या उपस्थित होत्या.