लॉकर फोडण्याचा प्रयत्न : 31 हजार रुपये लांबविले
प्रतिनिधी/ बेळगाव
गणपत गल्ली येथील महिला आघाडी को-ऑप. सोसायटीत चोरीचा प्रकार घडला आहे. चोरटय़ांनी ड्राव्हरमधील 31 हजार रुपये पळविले असून लॉकर फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
शनिवारी सकाळी 9.15 वाजता चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. नेहमीप्रमाणे सोसायटीची झाडलोट करण्यासाठी कर्मचाऱयांनी दरवाजा उघडला असता चोरीची घटना उघडकीस आली. घटनेची माहिती समजताच मार्केटचे पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगेरी व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
यासंबंधी चेअरमन रेणू किल्लेकर यांनी फिर्याद दिली आहे. एक्झॉस्ट फॅन बसविण्यासाठी सोडलेल्या छोटय़ा खिडकीतून चोरटय़ांनी सोसायटीत प्रवेश केला आहे. एका चेंबरमध्ये प्रवेश करण्यासाठी काचा फोडण्यात आल्या आहेत. चेअरमन व व्यवस्थापकांच्या चेंबरमध्ये शोधाशोध करण्यात आली आहे. पहिल्या मजल्यावर ही सोसायटी आहे.
चोरटय़ांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. घटनास्थळावरून ठशांचे नमुने उपलब्ध झाले असून त्यावरून चोरटय़ांचा शोध घेण्यात येत आहे. रोकड चोरल्यानंतर चोरटे आले त्याच खिडकीतून बाहेर पडल्याचे उघडकीस आले. मार्केट पोलीस पुढील तपास करीत आहेत.