पुरुष लीगवेळीच नोव्हेंबरच्या प्रारंभी होणार आयोजन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी महिला आयपीएल (महिला टी-20 चॅलेंजर सिरीज) यावर्षीही घेतली जाणार असल्याचे रविवारी स्पष्ट करीत महिला आयपीएल यंदा होणार नसल्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला. त्यांच्या या घोषणेचे मिताली राजसह अन्य भारतीय महिला क्रिकेटपटूंनी स्वागत केले तर ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या काही महिला खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली.
यावर्षी पुरुष आयपीएल स्पर्धा संयुक्त अरब अमिरातमध्ये 19 सप्टेंबर ते 8 किंवा 10 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. भारतात कोव्हिड 19 महामारीची प्रकरणे मोठय़ा प्रमाणात वाढत असल्याने बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. या कालावधीत महिला आयपीएलही त्यात फिट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ‘यावर्षी महिला आयपीएलही होणार आहे, याची मी तुम्हाला खात्री देतो. याशिवाय राष्ट्रीय महिला संघासाठीही काही योजना आखली आहे,’ असे गांगुली यांनी आयपीएल जीसीच्या बैठकीला जाण्याआधी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
नोव्हेंबरच्या प्रारंभी महिला चॅलेंजर लीग
महिला आयपीएलबाबत त्यांनी सविस्तर तपशील दिला नसला तरी एका माहितगार वरिष्ठ पदाधिकाऱयाने गेल्या वर्षीप्रमाणे आयपीएलच्या शेवटच्या टप्प्यात त्याचे आयोजन केले जाणार असल्याचे सांगितले. ‘महिला टी-20 चॅलेंजर मालिकेचे आयोजन 1 ते 10 नोव्हेंबर या कालावधीत केले जाण्याची शक्यता असून त्याआधी त्यांचे सराव शिबिर होऊ शकेल,’ असे या सूत्राने सांगितले. गांगुली यांनी, ‘मध्यवर्ती करार झालेल्या महिला खेळाडूंचे शिबिर घेतले जाणार आहे. कोरोना महामारीमुळे कोणत्याही खेळाडूला आरोग्याचा धोका पोहोचू नये यासाठी आम्ही शिबिर घेण्याचे टाळले होते. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीही सध्या बंद आहे. पण आम्ही महिलांचे शिबिर आयोजित करण्याची योजना तयार केली आहे,’ असे गांगुली यांनी स्पष्ट केले. महिलांसाठी बीसीसीआयने दोन पूर्ण कसोटी मालिका आयोजित करण्याचा विचार चालविला असून न्यूझीलंडमधील विश्वचषक स्पर्धेआधी दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडीजविरुद्ध या मालिका घेण्याची त्यांची योजना आहे. महिलांचा इंग्लंड दौरा रद्द करण्यात आल्यानंतर महिला खेळाडूंनी बीसीसीआय महिला क्रिकेटकडे दुर्लक्ष करीत असल्याची टीका केली होती.
भारतीय महिला खुश, तर ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड महिला नाराज
मिताली राज, पूनम यादवसह भारताच्या अनेक महिला क्रिकेटपटूंनी गांगुली यांच्या घोषणेचे स्वागत केले. गेल्या मार्चमध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या महिलांच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय महिला संघ क्रिकेटपासून दूर राहिला आहे. फक्त वनडेत खेळणारी मिताली तर गेल्या वर्षीच्या नेव्हेंबरनंतर खेळलेली नाही. इंग्लंडचा दौराही रद्द करण्यात आल्यामुळे येत्या फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱया वनडे विश्वचषक स्पर्धेआधी भारतीय महिलांना खेळण्याची फारशी संधी मिळणार नव्हती. पण गांगुली यांच्या घोषणेनंतर त्याही खूश झाल्या आहेत. मात्र ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या महिला क्रिकेटपटू या निर्णयावर नाराज झाल्या आहेत. कारण याच सुमारास ऑस्ट्रेलियात महिला बिग बॅश टी-20 लीग होत असल्याने दोन्हीकडे एकाचवेळी खेळणार कसे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. या खेळाडूंत ऍलीसा हीली, रॅचेल हेन्स, न्यूझीलंडची सुझी बेट्स यांचा समावेश आहे. बिग बॅश लीग 17 ऑक्टोबर ते 29 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे.