महिला आयोगाच्या अध्यक्ष विद्या गावडे यांची माहिती
प्रतिनिधी /पणजी
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या सूचनेनुसार राष्ट्रीय महिला संसदेचे दि. 2 मार्च रोजी सकाळी 9.30 वा ते सायं. 5.30 वाजेपर्यंत संस्कृती भवन पाटो येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून निर्मला सावंत, महिला व बालकल्याण खात्याच्या संचालिका दिपाली नाईक, प्रमुख वक्ते म्हणून पूनम सिरसाट, अरूण पांडे, केतकी गडेकर, जेनिफर, जयश्री परब, शेवटच्या सत्रात प्रसिद्ध गायिका हेमा सरदेसाई उपस्थित राहणार आहेत. याशिवाय बेटी बचाओ बेटी पढाओ आणि विवाहाचे वय 18 ते 21 वर्षावर केल्याप्रकरणी पथनाटय़ सादर करण्यात येणार असल्याची माहिती गोवा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विद्या गावडे सतरकर यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पूर्वी महिला आयोग हे गावागावात पोहचले नव्हते. आयोगाबाबत जागृतीही झाली नव्हती. त्यामुळे प्रकरणे आयोगापर्यंत पोहचत नव्हत्या. कोरोना काळात ऑनलाईन पद्धतीने प्रकरणे हाताळली आहेत. याशिवाय बहुतांश भागात महिलांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न आयोगाकडून करण्यात आला आहे. कौशल्य विकास कार्यक्रम महिलांसाठी सुरू करण्यात आला. वेगवेगळय़ा संघटनामार्फत कार्यक्रम, योजना, लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आल्या होत्या. पोषण माह कार्यक्रमांचे आयोजन, कोरोना काळात राष्ट्रीय क्रमांक सुरू करण्यात आला. सायबर पीस फाऊंडेशनच्या सहकार्याने सायबर गुन्हय़ाबाबत मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून येत्या काळात अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. महिलांच्या तस्करीवर तोडगा काढण्यासाठी सातत्याने बैठक होत आहेत. लवकरच या विषयावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार अशी माहिती विद्या गावडे यांनी यावेळी दिली.
आयसीसी समिती म्हणजेच नोकरीच्या ठिकाणी होणाऱया लैंगिक शोषणा संबंधी आळा घालण्यासाठी समिती स्थापन होणे आवश्यक होती तेव्हा साधारण 20 ते 25 समितीची यादी आली होती. परंतु त्यावर काहीच अजूनपर्यंत झाले नाहीत. साडेपाचशे शाळा, महाविद्यालये, कार्यालयात समिती स्थापन व्हावीत यासाठी सूचना करण्यात आल्या आहेत. 860 इंडस्ट्रीजमध्ये समिती स्थापन करण्याच्या सूचना पाठविण्यात आल्या आहेत. जेव्हा आयोगाची जबाबदारी घेतली तेव्हा सुमारे 200 प्रकरणे प्रलंबित होती. सध्या महिन्याला 15 ते 20 प्रकरणे नोंदणी होत आहेत. सध्या गोव्यात घरगुती हिंसाचाराची प्रकरणे वाढली आहेत. वनस्टॉप सेंटर, 181 यावरून पाहता 70 टक्के घरगुती हिंसाचार प्रकरणे आहेत. त्यावर तोडगा काढण्याचा प्रय़त्न केला जात आहे. 350 अत्याचाराबाबत सुनावणी झाल्या आहेत. 208 प्रकरणे कोरोना काळात घेण्यात आल्या आहेत. उपसमितीच्या सहकार्याने प्रकरणे हाताळण्यात आल्या आहेत. याशिवाय या प्रकरणांचा पाठपुरावाही केला जातो. सायबर गुन्हय़ांची प्रकरणे वाढली असल्याने कॉलेजमध्ये जाऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तालुकास्तरावर महिला आयोग पोहचावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे अशी माहिती गोवा महिला आयोगाच्या अध्यक्ष विद्या गावडे सतरकर यांनी यावेळी दिली.
गोव्यात 70 टक्के घरगुती हिंसाचाराची प्रकरणे दिसून येतात. वनस्टॉप सेंटर, सल्ला देण्याचा प्रयत्नही आयोगातर्फे केला जातो. अशा प्रकरणांमध्ये सुमारे 20 ते 25 टक्के यश मिळाले आहे. जोडप्यांना सल्ला देणे हे सध्याच्या परिस्थितीत आवश्यक असून महिला आयोगातर्फेही याविषयी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे असे विद्या गावडे यांनी यावेळी सांगितले.