देवरूखातील घटना, आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात
प्रतिनिधी/ देवरुख
देवरुख येथे 30 वर्षीय पूजा शिवकुमार राजपूत या महिला कृषी सहाय्यकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. राजपूत यांनी आत्महत्या का केली, याचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
देवरूख पोलीस ठाण्यातून प्राप्त माहितीनुसार, या बाबतची फिर्याद कृषीसेवक सुरेश विठ्ठल बोडके यांनी दिली. पूजा राजपूत या देवरुख तालुका कृषी अधिकारी कार्यालयात गेली 4 वर्षे कार्यरत होत्या. 27 नोव्हेंबर 2015 रोजी त्यांचा विवाह व दीड वर्षापूर्वी घटस्फोट झाला होता. त्यांचा भाऊ 2 दिवस दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता, मात्र तो न झाल्याने तळमजल्यावरील सुरेश बोडके यांच्याशी त्याने संपर्क साधून पूजाची चौकशी करण्यास सांगितले. यानुसार सुरेश बोडके शनिवारी सकाळी 10.30 च्या सुमारास पूजा यांच्या खोलीकडे गेले असता टेरेसवरील शौचालयांमध्ये ओढणीने गळफास लावलेल्या स्थितीत त्या आढळून आल्या.
या बाबतची खबर देवरुख पोलिसांना देण्यात आली. पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांनी सहकाऱयांसह पाहणी व पंचनामा केला. राजपूत यांच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. राजपूत यांनी 2 दिवसापूर्वी आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात त्यांच्या शवाचे विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव करीत आहेत.