लखनौ
उत्तर प्रदेशच्या कॅबिनेट मंत्री कमल राणी वरुण यांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. त्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या सदस्या होत्या. यापूर्वी त्या खासदारही राहिल्या आहेत. सध्या योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात त्या तंत्रशिक्षण खात्याची धुरा सांभाळत होत्या. पंधरा दिवसांपूर्वी कमल वरुण यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर लखनौमधील पीजीआय रुग्णालयात उपचार सुरू होते.
राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी आपला नियोजित अयोध्या दौराही अचानक रद्द केला. ‘उत्तर प्रदेश सरकारमधील माझ्या सहकारी, कॅबिनेट मंत्री कमल राणी वरुणजी यांच्या अकाली निधनाची माहिती दु:ख देणारी आहे. राज्याने त्यांच्या रूपात एक नि÷ावंत सार्वजनिक नेता गमावला. मी त्यांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त करतो. देव दिवंगत आत्म्याला त्यांच्या चरणी स्थान देवोत. ॐ शांती!’ असे योगी आदित्यनाथ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
कमल वरुण यांचा जन्म 3 मे 1958 रोजी झाला होता. त्या घाटमपूर, कानपूर शहरातून आमदार होत्या. यापूर्वी त्या 11 व्या आणि 12 व्या लोकसभेच्या सदस्य होत्या. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी लोकांच्या आकांक्षांचा आदर केला. मंत्री म्हणून त्यांनी विभागीय कामे कुशलतेने पार पाडण्यात स्तुत्य योगदान दिले आहे.