वृत्तसंस्था/ टोकियो
टोकियो ऑलिंपिकसाठी शेवटच्याक्षणी प्रवेश मिळालेली भारताची महिला गोल्फपटू दीक्षा डागरने शनिवारी टोकियोकडे प्रयाण केले. अन्य खेळाडूने माघार घेतल्याने दीक्षाला ऐनवेळी प्रवेश देण्यात आला.
महिलांच्या गोल्फ या क्रीडाप्रकारात आता अदिती अशोक आणि दीक्षा डागर भारताचे प्रतिनिधीत्व करतील. महिलांच्या गोल्फला 4 ऑगस्टपासून प्रारंभ होईल. दीक्षाची ही पहिली तर अदिती अशोकची ही दुसरी ऑलिंपिक स्पर्धा आहे. दीक्षा डागरने यापूर्वी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्याचे माझे स्वप्न होते आणि ते साकार झाले, अशी प्रतिक्रिया दीक्षाने टोकियोला प्रयाण करण्यापूर्वी वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केली. या क्रीडाप्रकारात भारताला पदक मिळवून देणे हे उद्दिष्ट आहे, असेही ती म्हणाली.
आंतरराष्ट्रीय गोल्फ फेडरेशनने भारतीय गोल्फ संघटनेशी संपर्क साधत दीक्षा डागरला ऑलिंपिक स्पर्धेसाठी शेवटच्याक्षणी पात्र ठरविण्यात आल्याची माहिती दिली. दीक्षाला यापूर्वी ऑलिंपिकसाठी पात्रता सिद्ध करता आली नसल्याने ती आयर्लंडमध्ये होणाऱया आयएसपीएस हांडा निमंत्रितांच्या गोल्फ स्पर्धेत सहभागी होणार होती. दीक्षा जन्मता बहिरी असल्याने तिने 2017 साली झालेल्या बहिऱयांच्या ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करताना रौप्यपदक पटकाविले होते. भारतीय क्रीडा प्राधीकरण मंडळ, भारतीय सेनादल आणि परराष्ट्र व्यवहार खात्याचे दीक्षाने आभार मानले आहेत. ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होण्याची संधी दीक्षाला शेवटच्याक्षणी मिळाली असून या स्पर्धेत ती आपल्या देशाला पदक मिळवून देण्याचा प्रयत्न करेल, असा विश्वास भारताचा आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता आणि अर्जुन पुरस्कार विजेता गोल्फपटू अमीत लुथराने व्यक्त केला आहे.