स्पर्धा जिंकणारा स्पेनचा पहिला महिला संघ
वृत्तसंस्था/ गोथेनबर्ग
बार्सिलोनाच्या महिला फुटबॉल संघाने येथे झालेल्या सामन्यात चेल्सीचा 4-0 असा एकतर्फी धुव्वा उडवित महिलांच्या चॅम्पियन्स लीगचे पहिल्यांदाच जेतेपद पटकावले. या स्पर्धेचे जेतेपद मिळविणारा बार्सिलोना हा स्पेनचा पहिला संघ बनला आहे. तसेच महिला व पुरुष दोन्ही चॅम्पियन्स लीग स्पर्धा जिंकणारा बार्सिलोना हा पहिला संघ बनला आहे.
ला लिगाचे चॅम्पियन्स असणाऱया बार्सिलोनाने पहिल्या 36 मिनिटांतच चार गोल नोंदवत जेतेपदाच्या दिशेने आगेकूच केली होती. या चार गोलमध्ये मेलॅनी ल्युपोल्झच्या स्वयंगोलाचाही समावेश आहे. याशिवाय ऍलेक्सिया पुटेलासने पेनल्टीवर आणि आयताना बोनमाती व कॅरोलिन ग्रॅहम हॅन्सेन यांनी बार्सिलोनाचे उर्वरित गोल नोंदवत जेतेपद निश्चित केले. बार्सिलोनाने स्पॅनिश ला लिगाचे जेतेपद पटकावताना 26 सामन्यांत शंभर टक्के रेकॉर्ड ठेवले आणि तब्बल 123 गोलांचा फरक राखला होता.
इंग्लिश चॅम्पियन्स चेल्सीला या मोसमात चौथे जेतेपद पटकावण्याची संधी होती. पण बार्सिलोना संघाचा वेग आणि हालचालींसमोर ते पुरते बेजोड ठरले. सामन्याच्या 33 व्या सेकंदालाच बार्सिलोनाला आघाडी मिळाली. लीके मर्टेन्सचा जोरदार फटका क्रॉसबारला लागून परतल्यावर फ्रान किर्बीने तो क्लीअर करण्याचा प्रयत्न केला. पण त्या प्रयत्नात चेंडू ल्युपोल्झला लागून त्यांच्याच जाळय़ात जाऊन विसावला. चेल्सीला बरोबरी साधण्याची लगेचच संधी मिळाली होती. पण परनिले हार्डरने अगदी जवळून मारलेला फटका बारवरून बाहेर गेल्याने ही संधी हुकली. बार्सिलोनाच्या जेनी हर्मोसोलाही एक संधी मिळाली होती. पण तिनेही तो फटका वाईड मारला. त्यानंतर चेल्सीच्या हार्डरने केलेली आगेकूच रोखण्यात बार्सिलोनाने यश मिळविले. ल्युपोल्झने चॅलेंज केल्यानंतर हर्मोसो खाली पडली. त्यामुळे बार्सिलोनाला पेनल्टी मिळाली. त्यावर पुटेलासने अचूक गोल नोंदवून बार्सिलोनाची आघाडी 2-0 अशी केली.
एका अप्रतिम सांघिक चालीवर बार्सिलोनाने ही आघाडी 3-0 अशी केली. मर्टेन्सने हर्मोसोला चेंडू पुरविल्यानंतर तिने तो बोनमातीकडे पास केला. बोनमातीने ऍन कॅट्रिन बर्गरला हुलकावणी देत चेंडूला जाळय़ाची अचूक दिशा दिली. त्यानंतर मर्टेन्सने हॅन्सेनला चेंडू पुरविल्यानंतर रिकाम्या गोलपोस्टमध्ये तिने तो टॅप करीत संघाचा चौथा गोल नेंदवला. उत्तरार्धात चेल्सीच्या सॅम केरला अनेक संधी मिळाल्या होत्या. पण तिला त्या साधता आल्या नाहीत. बार्सिलोनाने भक्कम आघाडी मिळविली असल्याने नंतर त्यांनी हॅन्सेन व हर्मोसो यांच्या जागी दुसऱया खेळाडूंना संधी दिली. मोठय़ा फरकाने अंतिम लढत जिंकण्याचा नवा विक्रमही बार्सिलोनाने येथील सामन्यात नोंदवला.
दोन वर्षापूर्वी बार्सिलोना महिला संघावर अशीच वेळ आली होती. लियॉनविरुद्ध झालेल्या त्या सामन्यात पहिल्या 30 मिनिटांतच बार्सिलोना संघ 0-4 असे पिछाडीवर पडला होता. फ्रान्सचा बलाढय़ संघ असणाऱया लियॉनने ही स्पर्धा मागील पाच मोसमात जिंकली होती. पण यावेळी पॅरिस सेंट जर्मेनने त्यांचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आणले होते. मात्र पीएसजीला उपांत्य फेरीत बार्सिलोनाकडून पराभव स्वीकारावा लागल्याने त्यांना स्पर्धेबाहेर पडावे लागले. चेल्सीला मात्र 2007 नंतर युरोपियन चॅम्पियन्स होणारा पहिला इंग्लिश संघ होण्याची संधी यावेळी साधता आली नाही. 2007 मध्ये अर्सेनलने असे यश मिळविले होते.