वृत्तसंस्था/ लेबनॉन
इस्त्रायलची ऑलिंपिक सुवर्णपदक विजेती महिला जिम्नॅस्ट लिनॉय ऍशरम हिने ऍथलेटिक्स क्षेत्रातून निवृत्तीची घोषणा केली आहे. ऍशरमने आपल्या वयाच्या 22 व्या वर्षी निवृत्तीचा निर्णय घेतला असून नजीकच्या काळात ती प्रशिक्षकाच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करणार आहे.
गेल्यावर्षी झालेल्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत इस्त्रायलच्या लिनॉय ऍशरमने वैयक्तिक ऑल राऊंड जिम्नॅस्टिक प्रकारात सुवर्णपदक पटकाविले होते. ऍशरम ही ऑलिंपिक तालबद्ध जिम्नॅस्टिक चॅम्पियन आहे. ऍशरमने आपल्या जिम्नॅस्टिक कारकीर्दीत 2017, 2018 आणि 2019 साली झालेल्या विश्व जिम्नॅस्टिक स्पर्धेत सहा रौप्य आणि पाच कांस्यपदके मिळविली आहेत. गेल्यावर्षी झालेल्या विश्वचषक जिम्नॅस्टिक स्पर्धेत तिने दोन सुवर्ण आणि एक कांस्यपदक मिळविले. 2020 साली झालेल्या युरोपियन चॅम्पियनशीप स्पर्धेत तिने महिलांच्या ऑल राऊंड जिम्नॅस्टिक प्रकारात सुवर्णपदक मिळविले होते.