एकमेव सामन्यात 18 धावांनी विजय
वृत्तसंस्था/ क्वीन्सटाऊन, न्यूझीलंड
सुझी बेट्स, सोफी डेव्हाईन यांचे उपयुक्त योगदान, जेस केर व अमेलिया केर यांची भेदक गोलंदाजी यांच्या बळावर न्यूझीलंड महिला संघाने भारतीय महिला संघावर एकमेव टी-20 सामन्यात 18 धावांनी विजय मिळविला. एक बळी व 16 चेंडूत 27 धावा फटकावणाऱया लीया ताहुहूला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान मिळाला. आता या दोन संघांत पाच सामन्यांची वनडे मालिका होणार असून यातील पहिला सामना शनिवारी खेळविण्यात येणार आहे.
न्यूझीलंडने निर्धारित 20 षटकांत 5 बाद 155 धावा जमविल्यानंतर भारतीय महिलांना 20 षटकांत 8 बाद 137 धावांवर रोखत 18 धावांनी विजय मिळविला. न्यूझीलंडच्या 156 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शफाली वर्मा व यास्तिका भाटिया यांनी भारताला चांगली सुरुवात करून देताना 41 धावांची सलामी दिली. पण सातव्या षटकांत अमेलिया केरने शफाली (13) व भाटिया (26) यांना बाद केल्यानंतर भारतावर दडपण आले. हरमनप्रीत कौरचा खराब फॉर्म या सामन्यातही कायम राहिला. जेस केरने तिला त्रिफळाचीत करण्याआधी तिने 12 धावा केल्या. यावेळी भारताच्या 3 बाद 67 धावा झाल्या होत्या आणि 55 चेंडूत 89 धावांची गरज होती. एस. मेघना व रिचा घोष यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न करताना 34 धावांची भागीदारी केली. लीया ताहुहूने मेघनाला (30 चेंडूत 6 चौकारांसह 37) बाद करीत ही जोडी फोडली. शेवटच्या 5 षटकांत भारताला 55 धावांची गरज असताना ठरावीक अंतराने गडी बाद होत गेले आणि जेस केरने सिमरन बहादुरला बाद करून भारताला 137 धावांवर रोखत न्यूझीलंडचा विजय साकार केला. सिमरनने 6 चेंडूत 10 धावा फटकावल्या. भारताच्या डावात भाटियाने एकमेव षटकार नोंदवला. न्यूझीलंडच्या हॅले जेन्सेन, जेस व अमेलिया केर यांनी प्रत्येकी 2, ताहुहू व सोफी डेव्हाईन यांनी एकेक बळी मिळविला.
त्याआधी प्रथम फलंदाजी मिळाल्यावर न्यूझीलंडच्या डावात बेट्सने 36, डेव्हाईनने 31 धावा करीत संघाला आव्हानात्मक धावसंख्या रचून दिली. दोघींनी 60 धावांची सलामी दिली. दीप्ती शर्माने डेव्हाईनला बाद करीत ही जोडी फोडली. याशिवाय अमेलिया केर (17), मॅडी ग्रीन (26), लीया ताहुहू (14 चेंडूत 27) यांनीही उपयुक्त योगदान दिले. कॅटी मार्टिनने 3 चेंडूत नाबाद 9 धावा करीत संघाला दीडशेचा टप्पा गाठून दिला होता. दीप्ती शर्मा व पूजा वस्त्रकार यांनी प्रत्येकी 2, राजेश्वरी गायकवाडने एक बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक ः न्यूझीलंड महिला 20 षटकांत 5 बाद 155 (बेट्श 36, डेव्हाईन 31, ताहुहू 27, दीप्ती शर्मा 2-26, पूजा 2-16), भारत महिला 20 षटकांत 8 बाद 137 (मेघना 37, भाटिया 26, पूजा व सिमरन प्रत्येकी 10, जेस केर 2-20, ए.केर 2-2 5, जेन्सेन 2-25, ताहुहू 1-27, डेव्हाईन 1-21).