ऑनलाईन टीम / मुंबई :
संपूर्ण जगभरात 8 मार्च हा दिवस महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा आणि खास संदेश दिला आहे.
राज ठाकरे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, 8 मार्च, आज जागतिक महिला दिन. मुळात महिला दिन हा वर्षातून एकदाच का साजरा करायचा हे मला समजत नाही. आमचे आजोबा, प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे, “बांधवांनो, महिलांबद्दल जितका-जितका आदर तुम्ही आपल्या अंतःकरणात साठवत जाल, वाढवत जाल तितके शिवराय तुमच्यावर फार प्रसन्न होतील” त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जशी 365 दिवस साजरी व्हायला हवी तसंच महिलांचा म्हणजे खऱ्या अर्थाने ह्या जगतनियंत्याचा सन्मान 365 दिवस साजरा झाला पाहिजे. असो.
मी मागे एकदा एका भाषणात माता-भगिनींना उद्देशून जे बोललो होतो ते आज पुन्हा सांगतो; तुम्हाला कोणी सक्षम करण्याची गरज नाही तुम्ही स्वतः सक्षमच आहात. तुम्ही तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून आणि दुसऱ्या स्त्रीचं दुःख आपलं मानून कृती करू लागलात तर जगात कुठल्याच स्त्रीवर अन्याय होऊ शकणार नाही, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले, राजकारणात किंवा समाजकारणात कार्यरत असणाऱ्या महिलांनाही माझं आवर्जून सांगणं आहे तुम्ही कोणाचंही प्यादं बनून रहायची गरज नाही, तुम्ही थेट निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हा, तुम्हाला अपेक्षित बदल तुम्हीच घडवू शकता आणि जग बदलवू शकता. बाकी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा!!!
असे म्हणत राज ठाकरे यांनी महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तुम्हाला कोणी सक्षम करण्याची गरज नाही तुम्ही स्वतः सक्षमच आहात, असे म्हणत महिलांच मनोबल वाढवले आहे. आज महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार होण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशा वेळी महिलांनी गप्प न राहता अन्यायाविरोधात आवाज उठवायला हवा.