वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भुवनेश्वर येथे स्पेनविरुद्ध होणाऱया एफआयएच महिला हॉकी प्रो लीग लढतीत भारतीय संघाचे नेतृत्व अनुभवी गोलरक्षक सविताकडे सोपविण्यात आले असल्याचे सोमवारी जाहीर करण्यात आले. हॉकी प्रो लीगमधील भारताची ही पदार्पणाची लढत असेल.
नियमित कर्णधार रानी रामपालच्या गैरहजेरीत सविता संघाचे नेतृत्व पुढे चालू ठेवेल तर डिफेंडर दीप ग्रेस एक्का उपकर्णधारपद सांभाळेल. 26 व 27 फेब्रुवारी रोजी या दोन लढती होणार आहेत. गेल्या महिन्यात ओमानमधील मस्कत येथे झालेल्या महिलांच्या आशिया चषक स्पर्धेत भारताने सविताच्या नेतृत्वाखाली तिसरे स्थान मिळविले होते. स्पेनविरुद्धच्या लढतींसाठी 22 खेळाडूंची घोषणा करण्यात आली असून त्यात झारखंडच्या संगीता कुमारी या नव्या चेहऱयाचा समावेश आहे. या संघात तीन गोलरक्षक सविता, रजनी एतिमर्पू, बिछू देवी खैरबम यांचा समावेश आहे. आशिया चषक स्पर्धेत खेळलेल्या चौघींना या संघात स्थान मिळाले आहे. बिछू देवीसह अन्य तीन जादा खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले असून त्यात डिफेंडर इशिका चौधरी, मिडफिल्डर नमिता टोपो, स्ट्रायकर्स संगीता व रजविंदर कौर यांचा समावेश आहे.
याशिवाय हॉकी इंडियाने पाच राखीव खेळाडूंचा समावेश केला आहे. रश्मिता मिन्झ, अक्षता आबासो ढेकळे, सोनिका, मारियाना कुजुर, ऐश्वर्या राजेश चौहान यांचा त्यात समावेश आहे. ‘स्पेनविरुद्ध होणाऱया या दोन लढतींसाठी आम्ही सज्ज झालो आहोत. ओमानहून परतल्यानंतर आपल्या संघाने दोन आठवडय़ांचे ट्रेनिंग घेतले असल्याने स्पेनविरुद्ध आपली क्षमता दाखविण्यास ते आतुर झाले आहेत. तुमच्याकडे समान ताकदीच्या खेळाडूंचा संच असतो, तेव्हा संघनिवड करणे नेहमीच कठीण जाते. पण नव्या खेळाडूंत सुधारणा होत आहे, याचा आनंद वाटतो,’ असे प्रमुख प्रशिक्षक जॅनेक शॉपमन म्हणाल्या.
या सामन्यांत स्पेनविरुद्ध भारतीय महिलांना सरस कामगिरी करण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. ‘स्पेन हा बलाढय़ प्रतिस्पर्धी असून उच्च स्तरावर त्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत त्यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. पण त्यांनी मागील विश्वचषक स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे. ते अतिशय कौशल्यपूर्ण खेळण्यात तरबेज असून त्यांचा बचावही भक्कम आहे. त्यामुळे वेग व कौशल्य आणि भक्कम बचाव यांच्या आधारे त्यांना कडवी लढत आपल्या संघाला द्यावी लागणार आहे,’ असेही त्या म्हणाल्या.
भारतीय महिला हॉकी संघ ः सविता (कर्णधार), बिछू देवी खारीबम, रजनी एतिमर्पू. बचावफळी-दीप ग्रेस एक्का (उपकर्णधार), गुरजित कौर, निक्की प्रधान, उदिता, इशिका चौधरी. मध्यफळी-निशा, सलिमा टेटे, सुशीला चानू पुखराम्बम, ज्योती, मोनिका, नेहा, नवज्योत कौर, नमिता टोपो. आघाडी फळी-वंदना कटारिया, शर्मिला देवी, नवनीत कौर, लालरेमसियामी, संगीता कुमारी, रजविंदर कौर. राखीव खेळाडू-रश्मिता मिन्झ, अक्षता आबासो ढेकळे, सोनिका, मारियाना कुजुर, ऐश्वर्या राजेश चौहान.