वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
2021-22 च्या फुटबॉल हंगामामध्ये भारतीय महिला फुटबॉल संघाचे पुनरागमन या लीगद्वारे होत आहे. सदर भारतीय महिला फुटबॉल लीग स्पर्धा भुवनेश्वरमध्ये 15 एप्रिलपासून खेळविली जाणार आहे.
महिलांच्या फुटबॉल लीग स्पर्धेत एकूण 12 संघांचा समावेश आहे. ही स्पर्धा 26 मे पर्यंत चालणार असून लीग पद्धतीने ती खेळविली जाणार आहे. भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर या स्पर्धेतील सामने खेळविले जातील. या स्पर्धेमध्ये विद्यमान विजेता गोकुळम केरळ एफसी, हन्स महिला एफसी दिल्ली, किकस्टार्ट एफसी कर्नाटक, ओडिशा पोलीस, सेतू मदुराई तामिळनाडू, पीआयएफए स्पोर्ट्स कुलाबा एफसी महाराष्ट्र, माता रुक्मिणी एफसी छत्तीसगड गोव्याचा शिरोडे स्पोर्ट्स क्लब गोवा, इंडियन ऍरोज, पश्चिम बंगालचा एसएसबी महिला एफसी संघ, स्पोर्ट्स ओडिशा यांचा समावेश आहे. या स्पर्धेमध्ये पात्र फेरीतील एक संघ सहभागी होणार आहे. दरम्यान, पात्र फेरीची स्पर्धा 1 ते 5 एप्रिल दरम्यान नवी दिल्लीत खेळविली जाणार आहे. या पात्र फेरीच्या स्पर्धेत 4 फुटबॉल क्लबचा समावेश राहील. भुवनेश्वरच्या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाला 11 सामने खेळावे लागतील. संपूर्ण स्पर्धेमध्ये अधिक गुण मिळविणाऱया संघाला 2021-22 च्या फुटबॉल हंगामातील इंडियन महिला लीग स्पर्धेतील विजेता म्हणून घोषित केले जाईल.