वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोना महामारी समस्येमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करावे लागले. तब्बल आठ महिन्यांच्या कालावधीनंतर भारतीय वरिष्ठ महिला फुटबॉल संघासाठी पहिले राष्ट्रीय सराव प्रशिक्षण शिबीर आयोजित केले आहे. हे शिबीर 1 डिसेंबरपासून गोव्यामध्ये सुरू होईल. 2022 च्या एएफसी आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी या शिबिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
2022 च्या एएफसी आशिया चषक आंतरखंडीय फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद भारत भूषविणार आहे. 1 डिसेंबरपासून सुरू होणाऱया भारतीय महिला फुटबॉलपटूंच्या पहिल्या राष्ट्रीय सराव शिबिरासाठी 30 फुटबॉलपटूंना हजर राहण्याचा आदेश प्रमुख प्रशिक्षक मेमॉल रॉकी यांनी दिला आहे. हे शिबीर सुरू होण्यापूर्वी कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन सक्तीने केले जाईल. भारतीय महिला फुटबॉल संघ पुन्हा मैदानावर फुटबॉल खेळण्यास आतुरलेला आहे, असे राष्ट्रीय संघाचे संचालक अभिषेक यादव यांनी सांगितले. या शिबिरावेळी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. भारतीय संघाचे डॉक्टर शेरीफ यांच्या सल्ल्याने सर्व सुविधा सज्ज केल्या जातील. या शिबिराकरिता महिला फुटबॉलपटू गोव्यात दाखल झाल्यानंतर त्यांची रॅपिड अँटीजेन चांचणी (आरएटी) घेतली जाईल. या चांचणीत खेळाडू निगेटिव्ह आले तर त्यांना पुढील सात दिवसांसाठी त्यांच्या वैयक्तिक खोल्यांमध्ये क्वारंटाईन करण्यात येईल. आठव्या दिवशी पुन्हा दुसऱयांदा कोरोना चांचणी घेतल्यानंतर त्यांना सराव शिबिरात दाखल होण्याची परवानगी दिली जाईल.
या सराव शिबिरासाठी 30 महिला फुटबॉलपटूंची निवड केली आहे. त्यामध्ये आदिती चौहान, ई छानू, मेबाम लिंथोगमेबी देवी, नारायणसॅमी सौम्या, असीम रोजा देवी, जंबानी टूडू, एल आशालता देवी, एल. स्वीटी देवी, रिटू राणी, रंजना छानू, मिशेल कॅस्टेना, डब्ल्यू एल देवी, यु.पेकपी देवी, ग्रेस लालरेमपरी, मनिषा, एन. रत्नबाला देवी, संगिता बेसफोर, ए. कार्तिका, सुमित्रा कामराज, कस्मिना, पॅरी झेका, ज्योती, अंजु तेंमांग, डी.ग्रेस, करिश्मा शिरवईकर, एस. रंगनाथन, रेणु, ज्योती, जी. सौम्या. दया देवी यांचा समावेश आहे.