प्रतिनिधी / हातकणंगले
कुंभोज जिल्हा परिषद सदस्य व कोल्हापूर जिल्हा परिषदेचे नूतन शिक्षण व अर्थ खात्याचे सभापती प्रवीण यादव यांच्या माध्यमातून हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील शिक्षणक्षेत्रात बदल करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून, सर्वसामान्य तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक सवलती पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल , तसेच त्यासाठी शासन दरबारी लागेल ते प्रयत्न करून ,मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाईल ,असे गौरवोद्गार माजी आमदार डॉ. सुजित मिंणचेकर यांनी काढले.
माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर हे त्यांच्या संपर्क कार्यालयात जिल्हा परिषद नूतन सभापती प्रविण यादव व महिला बालकल्याण सभापती पद्माराणी पाटील यांच्या सत्कार प्रसंगी बोलत ते होते. यावेळी आमदार डॉ. सुजित मिणचेकर फाउंडेशन यांच्यावतीने नूतन सभापती प्रवीण यादव व पद्माराणी पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नूतन सभापती प्रवीण यादव यांनी , “माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझ्यावरती जी जबाबदारी टाकली ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे संभाळणार असून ,त्यांनी दिलेल्या संधीचा मी विकासकामांच्या माध्यमातून नक्कीच सोनं करेन, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला .
यावेळी हातकणंगले माजी पंचायत समितीचे सभापती राजेश पाटील, अरविंद खोत, हेरले पोलीस पाटील नयन पाटील, शिक्षक नेते राजमोहन पाटील बाबासाहेब शिंगे, धोंडीराम कोरवी, संजय चौगुले दीपक पाटील, अभिनंदन शिखरे, अनिल जाधव, तसेच शिवसेना व महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.