वृत्त संस्था/ नवी दिल्ली
भारतीय वरिष्ठ महिला मुष्टियुद्ध संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राष्ट्रीय युवा प्रशिक्षक भास्कर भट्टची नियुक्ती जवळपास निश्चित झाली आहे. आगामी विश्व महिलांच्या मुष्टियुद्ध स्पर्धेपूर्वी भास्कर भट्टच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली जाईल.
भारताची राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती मुष्टियोद्धा अरूंधती चौधरीच्या विनंतीनुसार आगामी विश्व महिलांच्या मुष्टियुद्ध स्पर्धेसाठी भारताची ऑलिम्पिक रौप्य विजेती लोव्हलिना बोरोगेनला भारतीय संघात थेट प्रवेश दिला जाणार आहे. अखिल भारतीय मुष्टियुद्ध फेडरेशनचे सरचिटणीस हेमंता कलिताने लोव्हलिना बोरोगेनला 70 किलो वजनगटात या आगामी स्पर्धेसाठी थेट प्रवेश दिला जाईल, अशी माहिती दिली. महिलांची विश्व मुष्टियुद्ध स्पर्धा इस्तंबूलमध्ये डिसेंबर महिन्यात घेतली जाणार आहे. या स्पर्धेची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. 19 वर्षीय अरूंधती चौधरीने वर्षाच्या प्रारंभी झालेल्या विश्व युवा मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते.
आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध संघटनेचे अध्यक्ष उमर क्रेमलेव्ह चालू महिन्याच्या अखेरीस भारताला भेट देणार असून ते भारताच्या मुष्टियुद्ध फेडरेशनसमवेत या क्रीडा प्रकाराच्या विकासासाठी चर्चा करणार आहेत. त्याचप्रमाणे भारतीय पुरूष मुष्टियुद्ध फेडरेशनचे संचालक सँटीयागो निव्हा यांना डिसेंबरअखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. फेडरेशन नव्या विदेशी प्रशिक्षकाच्या शोधात आहेत. अपेक्षेप्रमाणे नवा प्रशिक्षक मिळाल्यानंतर स्वीडनच्या निव्हा यांचा करार संपुष्टात येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.